अखेर ठरलं ! विखे-पाटील, मोहिते-पाटील नाराज आमदारांसह नगर येथे मोदींच्या सभेत भाजपमध्ये प्रवेश करणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील आणि राष्ट्रवादीचे खासदार विजयसिंह मोहिते-पाटील हे काही नाराज आमदारांसह दि. 12 एप्रिल आणि 17 एप्रिल रोजी अहमदनगर आणि अकलूज येथे होणार्‍या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहिर सभेत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार आहेत. त्याबाबत विश्‍वसनीय सुत्रांनी माहिती दिली आहे. राधाकृष्ण विखे-पाटील आणि विजयसिंह मोहिते-पाटील यांनी याबाबत अधिकृतरित्या घोषणा केलेली नसली तरी त्यांचा दि. 12 एप्रिल, 17 एप्रिल रोजी भाजपमध्ये प्रवेश होणार असल्याचे आता निश्‍चित झाले आहे.

नगर दक्षिण लोकसभा मतदार संघ हा राष्ट्रवादी काँग्रेसने शेवटपर्यंत काँग्रेसला सोडला नाही. त्यामुळे राधाकृष्ण विखे-पाटील यांचे पुत्र डॉ. सुजय विखे-पाटील यांना भाजपमध्ये प्रवेश करावा लागला. भाजपने देखील पहिल्याच यादीत डॉ. सुजय विखे यांना उमेदवारी बहाल केली. त्यानंतर चर्चा सुरू झाली ती राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या भाजप प्रवेशाची. वेळावेळी राधाकृष्ण विखे-पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या बातम्या आल्या. मात्र, त्यानंतर खुलासा करत राधाकृष्ण विखे-पाटील आणि काँग्रेसने त्या वृत्‍ताचे खंडण केले. दि. 12 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अहमदनगर येथे जाहिर सभा आहे. ती सभा डॉ. सुजय विखे-पाटील यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आली असल्याने सभेची सर्व तयारी राधाकृष्ण विखे-पाटील हे स्वतः जातीने करीत आहेत. अशातच ते देखील दि. 12 एप्रिल रोजी होणार्‍या जाहिर सभेत भाजपमध्ये प्रवेश करतील अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. दरम्यान, माढयाचे खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिली नाही.

विजयसिंह मोहिते-पाटील यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावेळी विजयसिंह मोहिते-पाटील देखील भाजपमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा होती.पण विजयसिंह मोहिते-पाटील यांनी प्रवेश केला नव्हता. आता अखेर ठरलं आहे. राधाकृष्ण विखे-पाटील आणि विजयसिंह मोहिते-पाटील हे दोघेही दि. 12 एप्रिल आणि 17 एप्रिल रोजी अहमदनगर आणि अकलूज येथे होणार्‍या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहिर सभेत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार आहेत. दोघांच्या प्रवेशामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला मोठा धक्‍का बसणार आहेत. दरम्यान, राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासोबत काही नाराज आमदार देखील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्याबाबत अधिकृत माहिती अद्यापही उपलब्ध झालेली नाही.