राधाकृष्ण विखे-पाटील यांचे अद्यापही तळयात-मळयात ; विखेंकडून राहुल गांधी यांच्यावर जाहिर टीका

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे विरोधी पक्ष नेते पदाचा राजीनामा दिल्यानंतर राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आज (शनिवारी) पत्रकार परिषदत घेवुन थेट राहुल गांधी यांच्यावर जाहिर टीका केली. अहमदनगर जिल्हयातील लोणी येथे त्यांनी पत्रकार परिषद घेतली. लोकसभा निवडणुकांची घोषणा झाल्यापासुन ज्या घडामोडी घडल्या त्याबाबत विखेंनी थोडक्यात माहिती दिली. राजकीय आत्महत्या करण्याची वेळ काही जणांनी माझ्यावर आणली होती असेही ते पत्रकार परिषदेत म्हणाले. राहुल गांधी यांनी डॉ. सुजय यांना राष्ट्रवादीकडून निवडणुक लढण्यास हरकत नाही असे विधान केले होते. राहुल गांधींची भुमिका ऐकुन आपल्याला धक्‍काच बसल्याचेही विखे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

राधाकृष्ण विखे-पाटील यांचे पुत्र डॉ. सुजय विखे-पाटील यांनी यापुर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहिर केली. पहिल्या यादीच नगर दक्षिण लोकसभा मतदार संघातुन डॉ. सुजय विखे-पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. त्यानंतर प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील डॉ. विखे यांच्यासाठी सभा घेतली. मुख्यमंत्र्यांनी तर डॉ. विखे यांच्यासाठी नगर दक्षिण लोकसभा मतदार संघात अधिक लक्ष घातले. राष्ट्रवादी आणि भाजपने नगर दक्षिणची निवडणुक ही प्रतिष्ठेची केली. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नगर दक्षिणची निवडणुक अत्यंत महत्वाची ठरणार आहे. निकाल काय लागेल हे दि. 23 मे रोजी समजणार आहे. दरम्यान, डॉ. सुजय विखे-पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तेव्हपासुन राधाकृष्ण विखे-पाटील हे भाजपमध्ये जाणार असल्याच्या बातम्या वेळावेळी येत राहिल्या. मात्र, राधाकृष्ण विखे-पाटील यांनी वेळावेळी त्या बातम्यांचे खंडण केले. नगर दक्षिण लोकसभा मतदार संघात मुलगा डॉ. सुजय विखे-पाटील यांच्या प्रचारासाठी राधाकृष्ण विखे-पाटील सक्रिय झाले. अहमदनगरचे राष्ट्रवादीचे पक्षाचे निरीक्षक अंकुश काकडे यांनी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांना पत्र पाठवुन विखे यांच्यावर कारवाईची मागणी केली.

नगर दक्षिण आणि शिर्डी लोकसभा मतदार संघात अनेक राजकीय घडामोडी झाल्या. नगर दक्षिणची निवडणुक संपल्यानंतर मात्र राधाकृष्ण विखे-पाटील हे शिर्डी मतदार संघात शिवसेनेच्या म्हणजेच महायुतीच्या उमेदवारासाठी सक्रिय झाले. दरम्यान, शुक्रवारी राहुल गांधी यांची संगमनेर येथे जाहिर सभा झाली. त्यावेळी राधाकृष्ण विखे-पाटील हे शिर्डी लोकसभा मतदार संघातील शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रचार करीत होते. टीकेची झोड उठल्यानंतर राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विरोधी पक्ष नेते पदाचा राजीनामा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे सोपविला. राहुल गांधी यांनी राधाकृष्ण विखे-पाटील यांचा राजीनामा स्विकारला. राजीनामा दिल्यानंतर राधाकृष्ण विखे-पाटील काय भुमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले असतानाच आज (शनिवार) राधाकृष्ण विखे पाटील यांनी लोणी (अहमदनगर) येथे पत्रकार परिषद घेवुन आपण कार्यकर्त्यांशी बोलुन अंतिम निर्णय घेणार असल्याचे सांगितले. आपण विरोधी पक्ष नेते पदी राहुन अनेक लोकहिताच्या प्रश्‍नांना वाचा फोडल्याचे त्यांनी सांगितले. माझ्यामुळेच सरकारला शेतकर्‍यांची कर्जमाफी करावी लागली असेही ते म्हणाले. शेतकर्‍यांच्या अनेक प्रश्‍नांना आपण सभागृहात लावुन धरले असेही ते शेवटी म्हणाले. गेल्या साडेचार वर्षात भ्रष्टाचाराचा एकही आरोप माझ्यावर लागला नाही, मी तडजोडी केल्या नाही अशा शब्दात राधाकृष्ण विखे-पाटील यांनी भावना व्यक्‍त केली.