राधाकृष्ण विखेंची ‘आवराआवर’ सुरू ; आता राज्यातही नाही विरोधी पक्षनेता ?

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – काँग्रेस नेते आणि माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. मात्र त्यांच्या प्रवेशाची तारीख अजून नक्की झालेली नाही. परंतु त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर विधानभवनातील विरोधी पक्षनेते कार्यालयातील सामानाची आवराआवर सुरू झाली आहे. त्यामुळे हे अधिवेशन विरोधी पक्षनेत्याविनाच होण्याची शक्यता आहे. विखे पाटील यांनी त्यांच्या स्वीय सहाय्यकांनाही विधिमंडळातील विरोधी पक्षनेते कार्यालयाच्या कामाच्या जबाबदारीतून रिक्त होण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे लवकरात लवकर ते देखील भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी इच्छुक असल्याचे दिसून येत आहे.

‘या’ आठवड्यात होणार पक्षप्रवेश

काँग्रेसमध्ये नाराज असलेले विखे पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार हे जवळपास नक्की आहे आणि त्यांना मंत्रिपद देखील मिळणार असल्याची खात्रीशीर माहीती मिळत आहे. या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात त्यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार आहे. मंत्री होण्याआधी विखे पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश होईल, असं सुधीर मुनगंटीवार यांनीही सांगितलं आहे.

दरम्यान, विरोधी पक्षनेते नेमण्याचा संपूर्ण अधिकार हा विधानसभा अध्यक्षांना असल्याने आता ते कधी निर्णय घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.