मुख्यमंत्र्यांवरील भ्रष्टाचाराच्या गंभीर आरोपांबद्दल विखे पाटलांचा ‘यू-टर्न’ ; आता म्हणतात…

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – काँग्रेस नेते आणि माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. मात्र त्यांच्या प्रवेशाची तारीख अजून नक्की झालेली नाही. त्यांनी याआधीच आपल्या विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिलेला आहे. मात्र भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी काल आपल्या आमदारकीचा देखील राजीनामा दिला. त्यानंतर आज त्यांनी मुख्यमंत्र्यांवर करण्यात आलेल्या भ्रष्टाचाराच्या प्रश्नावर सपशेल यू-टर्न घेतला.

‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर मंत्र्यांवरील आरोपाचा विषय आता संपला’, असे म्हणत त्यांनी या प्रकरणावर सपशेल यू-टर्न घेतला. त्यामुळे विरोधी पक्षनेते असताना त्यांनी केलेला आरोप खोटा होता की भाजप प्रवेश करण्यासाठी त्यांनी हा यू-टर्न घेतला याची चर्चा आता रंगू लागली आहे. लोकसभा निवडणुकीत सुजय विखे पाटील यांना तिकीट न दिल्याने नाराज झालेल्या विखे पाटील यांनी आपल्या विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर काल त्यांनी आपल्या आमदारकीचा देखील राजीनामा दिला.

काँग्रेस आमदार भारत भालके, जयकुमार गोरे आणि माढ्याचे भाजप खासदार रणजित निंबाळकर यांच्यात विखे पाटलांच्या बंगल्यावर चर्चा झाल्याची देखील माहिती मिळत आहे. त्यामुळे त्यांच्याबरोबर किती आमदार भाजप प्रवेश करणार आहेत याची देखील उत्सुकता लोकांना लागून आहे. त्यामुळे आता ते भाजपमध्ये प्रवेश करून मंत्रिपद मिळवतात कि नाही आणि त्यांच्याबरोबर किती आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार याची वाट पाहावी लागणार आहे.