काँग्रेसचे प्रवक्तेपद स्वीकारले का ? राधाकृष्ण विखेंचा संजय राऊतांना टोला

पोलिसनामा ऑनलाईन – भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी संजय राऊतांना सामना अग्रलेखात केलेल्या टीकेला शैलीत उत्तर दिले आहे. आमची बांधिलकी सिल्व्हर ओक ते मातोश्री अस्वस्थ येरझारा घालत नाही असा टोला विखे यांनी राऊत यांना हाणला आहे. विखे पाटील यांनी आपल्या उत्तराचे पत्र ट्विट केले आहे, सामनाचा पारदर्शक कारभार पाहता आपण माझे उत्तर छापाल ही अपेक्षा, असेही त्यांनी म्हटले आहे.

फार पूर्वी ‘थोरातांची कमळा’ हा चित्रपट गाजला होता, आता ‘विखे पाटलांची कमळा’ असा चित्रपट आला अन पडला. काँग्रेसची खाट कुरकुरते की नाही ते पाहू, पण विखेंची ‘टूर अँड ट्रॅव्हल’ कंपनी बंद पडली आहे, मात्र त्यांची टूरटूर सुरु आहे, अशा शब्दात ‘सामना’च्या अग्रलेखातून भाजपा नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रा ट्वीट केले आहे. त्यामध्ये आपण माझ्यावर थेट अग्रलेख लिहिलात याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो. आपल्याच शब्दात सांगायचे तर मी सध्या वनवासात आहे. वनवासात असलेल्या विखेंची तुम्हाला अग्रलेख लिहून दखल घ्यावी लागली हेही नसे थोडके. मी राजकारणापासून दूर राहिलेलेच बरे असा सल्लाही आपण दिला आहे.फक्त जनता जनार्दनाला साक्षी ठेवून एवढेच सांगू इच्छितो की मी आपल्या कृपेने राजकारणात आलेलो नाही. त्यामुळे आपल्या सल्ल्याने राजकारणापासून दूर जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मला, माझ्या मुलाला व आतापर्यंत माझ्या घराण्याला राजकारणात भरभरून प्रतिसाद देण्याचे काम नगर जिल्ह्यातील जनतेने केले आहे.

आमची बांधिलकी त्या जनतेशी आहे आमची बांधिलकी कधी सिल्व्हर ओक तर कधी मातोश्री अशा अस्वस्थ येरझारा घालत नाही. नगर जिल्ह्यातील जनतेशी विखे घराण्याची नाळ पक्की जुळलेली आहे. अर्धी नाळ आपल्या नेत्यासोबत आणि अर्धी नाळ शरदाच्या चांदण्यात भिजतेय असा दुटप्पीपणा कोण करतेय ते ही लपून राहिलेले नाही. बाळासाहेबांच्या काळात धारदार अग्रलेखांची परंपरा होती. तेव्हा खरे रोखठोक अग्रलेख असत. आजच्यासारखी लाचारी त्यावेळी नव्हती. आज शिवसेनेचे प्रवक्तेपद सोडून काँग्रेस समितीचे प्रवक्तेपद टाळेबंदीच्या काळात स्वीकारले का ? आम्ही राजकीय पक्ष बदलले पण ज्या पक्षात राहिलो त्याचे निष्ठेने काम केले. आमची छाती फाडून पाहिली तर एका वेळी एकच नेता दिसेल.तुमची फाडून पाहिली तर उद्धव ठाकरे आणि शरद पवार असे दोघेही दिसतील.तुमचा हा बेगडीपणा लोकांना चांगलाच कळतो. त्यामुळेच तुम्हाला फारसे गांभीर्याने घ्यायचे नसते हे आता लोकांना कळू लागले आहे. एकीकडे राजभवनाबाबत धमकीवजा भाषा वापरायची आणि दुसरीकडे वाकून, लवून राजभवनावर कुर्निसात करायचा हे कोलांटउडीचे डोंबारी राजकारण आपण किती सहजगत्या करता हे अलीकडे महाराष्ट्राने बघितले आहेच.