सोनिया गांधीविरोधात भाजप ‘या’ महिला खासदाराला रिंगणात उतरवणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रायबरेली हा काँग्रेसचा पारंपारिक मतदारसंघ आहे. या मतदारसंघातून सोनिया गांधी यांचा पराभव करण्यासाठी भाजपच्या नवी दिल्लीच्या खासदार मीनाक्षी लेखी यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे. आजारपणामुळे सोनिया गांधी मतदारसंघात फार सक्रीय नाहीत. तरी देखील रायबरेलीत त्यांचा प्रभाव आहे.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने ७३ जागांवर विजय मिळवला होता. परंतु त्यांना रायबरेली तसेच अमेठी येथे विजय मिळवता आला नाही. यंदा रायबरेलीमधून विजय मिळवण्यासाठी भाजपने प्रयत्न सुरु केले आहेत. त्यासाठी भाजपकडून नवी दिल्लीच्या खासदार मीनाक्षी लेखी यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याची माहिती भाजपमधील सूत्रांनी दिली आहे. मीनाक्षी लेखी या भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्त्या आहेत. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी नवी दिल्ली मतदार संघातून ४.५० लाखांनी विजय मिळवला होता.

रायबरेली हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. १९९९ पासून लोकसभेचा हा मतदारसंघ काँग्रेसकडे आहे. काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि सध्याचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या प्रचाराची धुरा प्रियांका गांधी यांनी नेहमीच सांभाळली आहे. रायबरेली मतदारसंघ काँग्रेससाठी सुरक्षित मानला जात असला तरी १९७७ साली जनता पक्षाच्या राज नारायण यांनी याच मतदारसंघात इंदिरा गांधी यांचा पराभव केला होता. तसंच १९९६ आणि १९९८ मध्ये भाजपाने तिथं विजय मिळवला होता.