राफेल डील : राहुल गांधींचे पंतप्रधान मोदींना आव्हान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था- राफेल मुद्यावरुन राहुल गांधींनी पुन्हा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला आहे.लोकसभेतील चर्चेनंतर राहुल यांनी पत्रकार परिषद घेऊन पुन्हा सरकारवर आरोपांची सरबत्ती केली.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राफेल मुद्यावर थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना आव्हान दिले आहे. मी राफेल करारावर पंतप्रधान मोदींसोबत वादविवाद करण्यास तयार आहे. फक्त मला २० मिनिट वादविवादासाठी हवी आहेत. पण पंतप्रधान मोदींमध्ये माझ्यासोबत वादविवाद करण्याची हिम्मत नाही असे राहुल गांधी म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हेतूवरच त्यांनी शंका उपस्थितीत केली आणि जेपीसी मार्फेत चौकशीची मागणी केली. या चर्चेनंतरही ते शांत झालेले नाहीत. जेटलींच्या भाषणाचा हवाला देत राहुल गांधींनी सरकारवरच डाव उलटवण्याचा प्रयत्न केला.किंमत सांगणार नाही असं म्हणत असतानाच अरुण जेटलींनी स्वत:च किंमत सांगितली की या आधी ५२६कोटींच असलेलं विमान १६०० कोटींना घेतलं गेलं. ही किंमत का वाढविली याचं उत्तर सरकारने दिलं पाहिजे, अशीही मागणी त्यांनी पत्रकार परिषदेत केली.

राफेल डीलवरून सरकार व विरोधी एकमेकांसमोर आले आहेत. त्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. विरोधकांना दिलेल्या आश्वासनाला जागत आज राफेल करारावर लोकसभेत चर्चा घेण्यात आली. संसदेत राफेल प्रकरणावरून विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपला घेरण्यास सुरुवात केली आहे. राफेल प्रकरणावरून काँग्रेससह विरोधकांनी संयुक्‍त संसदीय समितीची मागणी केली आहे. याला अप्रत्यक्षरित्या शिवसेनेने पाठिंबा दिला आहे.