बहुचर्चित राफेलचा आज हवाई दलात होणार समावेश

पोलिसनामा ऑनलाईन टीम – भारतीय हवाई दलात आज बहुचर्चित राफेल विमानाचा समावेश करण्यात येणार आहे. अंबाला हवाई तळावर गुरुवारी राफेल लढाऊ विमानांच्या पहिल्या तुकडीचा भारतीय हवाई दलात औपचारिकरीत्या समावेश केला जाणार आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, त्यांचे फ्रान्समधील समपदस्थ फ्लोरेन्स पार्ली, संरक्षण दले प्रमुख जनरल बिपिन रावत, हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल आरकेएस भदौरिया व संरक्षण सचिव अजय कुमार कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

फ्रान्सच्या ‘दसॉल्त अ‍ॅव्हिएशन’ कंपनीने तयार केलेली राफेल लढाऊ विमाने त्यांचे आकाशातील प्रभुत्व आणि अचूक हल्ले यांसाठी प्रसिद्ध आहेत. भारताच्या विनंतीनंतर राफेल’ देण्यास फ्रान्स सरकारने परवानगी दिली होती. दरम्यान, आज ‘राफेल’च्या समावेशाबरोबरच, पारंपरिक सर्वधर्म पूजा, राफेल आणि तेजस विमानांसह ‘सारंग हवाई कसरत चमूचे’ हवाई प्रदर्शन यांचा कार्यक्रमात समावेश असून हवाई दलाच्या इतिहासातील ‘अतिशय महत्त्वाचा मैलाचा दगड’ असल्याचे सांगण्यात आले आहे.

राफेल विमानांचा हवाई दलाच्या 17व्या स्क्वाड्रनमध्ये समारंभपूर्वक समावेश होण्यापूर्वी राफेलच्या ताफ्याला पाण्याच्या तोफांची (वॉटर कॅनन) पारंपरिक सलामी दिली जाईल, असे वायुदलाचे प्रवक्ते विंग कमांडर इंद्रनील नंदी यांनी सांगितले. या समारंभात सहभागी होणार्‍या फ्रेंच शिष्टमंडळात फ्रान्सचे राजदूत इमॅन्युएल लेनाइन, फ्रान्सच्या वायुसेनेचे उपप्रमुख एअर जनरल एरिक ऑटेलेट, दसॉल्त अ‍ॅव्हिएशनचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी एरिक ट्रॅपियर आणि क्षेपणास्त्र उत्पादक कंपनी एमबीडीएचे सीईओ एरिक बेरांजर यांचा समावेश असेल. 59 हजार कोटी रुपये किमतीची 36 राफेल विमाने खरेदी करण्यासाठी भारताने फ्रान्सशी आंतर-सरकार करार केल्यानंतर सुमारे 4 वर्षांनी पाच राफेल विमानांची पहिली तुकडी 29 जुलैला भारतात पोहोचली होती.