राफेलची कागदपत्रे चोरीला…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था- राफेल लढाऊ विमान खरेदी प्रकरण वादाच्या भोवऱ्यात असतांनाच,आता या कराराची महत्वाची कागदपत्रे संरक्षण मंत्रालयातून चोरीला गेल्याची धक्कादायक माहिती महाधिवक्ता के.के वेणूगोपाल यांनी सरकारच्या वतीनं आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणीदरम्यान दिली. कागदपत्रे चोरीला गेल्या प्रकरणी यात सरकारने काय कारवाई केली. हे सांगावे, असे आदेश महाधिवक्त्यांना कोर्टाने दिले आहेत.

लोकसभा निवडणुकीपूर्वी पुन्हा राफेल प्रकरण चर्चेत आलं आहे. सुप्रीम कोर्टाने राफेल प्रकरणी १३ डिसेंबर २०१८ रोजी दिलेल्या निर्णयावर, दाखल फेरविचार याचिकांवर आज सुनावणी झाली. सुनावणीच्या सुरुवातीलाच ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी काही महत्वाची कागदपत्रे सादर केली. मात्र, या प्रकरणी आणखी नवीन पुरावे स्वीकारू शकत नाही, असं सांगत त्यांनी दिलेली कागदपत्रे स्वीकारण्यास नकार दिला. तसेच सरकारच्या वतीनं महाधिवक्ता के. के. वेणूगोपाळ यांनी देखील बाजू मांडली.त्यांनी सांगितले की, ‘राफेल’संबंधी महत्वाची कागदपत्रे संरक्षण मंत्रालयातून चोरीला गेली आहेत. याचा तपास देखील सुरू आहे.

हे प्रकरण खुप संवेदनशिल आहे. असे देखील ते म्हणाले. याचिकाकर्ते अँड. भूषण आणि दोन वृत्तपत्रांसह अन्य व्यक्ती चोरी गेलेल्या कागदपत्रांवर विश्वास दाखवत आहेत. त्यामुळं त्यांना अधिकृत गोपनीयता कायद्यान्वये खटल्याचा सामना करावा लागू शकतो. आम्ही दोन वर्तमानपत्रे आणि एका ज्येष्ठ वकिलाविरोधात कारवाई करणार आहोत, अशी माहितीही त्यांनी कोर्टात दिली. दरम्यान, आज दोन वाजता पुन्हा या प्रकरणाची सुनावणी कोर्टात सुरु होणार आहे