Rafale Deal : ‘त्या’ ऑडिओ क्लिपवरून काँग्रेसचा दिशाभूल करण्याचा प्रयत्न ; पर्रिकरांचे ट्विट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राफेल डीलवरून सरकार व विरोधी एकमेकांसमोर आले आहेत. त्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. तत्कालीन संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांच्या बेडरूममध्ये राफेल व्यवहाराची रहस्ये असल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. काँग्रेसचा दिशाभूल करण्याचा प्रयत्न असून अशा प्रकारची कोणतीच चर्चा कॅबिनेट बैठकीत झाली नव्हती, असा खुलासा पर्रिकर यांनी केला आहे. राफेल कराराला ज्यावेळी मान्यता देण्यात आली त्यावेळी पर्रिकर केंद्रात संरक्षण मंत्री होते. आपल्या कार्यकाळात कॅबिनेटमध्ये आणि इतर कोणत्याही बैठकीत अशी चर्चा झाली नसल्याचे पर्रिकर यांनी ट्विटरवरून प्रतिक्रिया देताना सांगितले. ‘पर्रिकर यांनी कॅबिनेट बैठकीत आपल्याकडे राफेल घोटाळ्यासंबंधीत कागदपत्रे असून आपले कोणीच काही करू शकत नाही’, असे म्हटले होते, असा दावा काँग्रेसने विश्वजित राणे यांची ऑडिओ क्लिप पत्रकार परिषदेत प्रसारित करून केला होता.
मनोहर पर्रीकरांचे ट्विट –
”राफेल करारावर सुप्रीम कोर्टानं दिलेल्या निर्णयामुळे काँग्रेसचा खोटरडेपणा जाहीर झाला. यामुळे कॉंग्रेस पार्टीकडून सत्याचा विपर्यास करण्याचा प्रयत्न म्हणून ही ऑडिओ क्लिप जारी आली. राफेल संदर्भात कधीही कॅबिनेट अथवा अन्य कोणत्याही बैठकीत चर्चा झालेली नाही” असे ट्विट मनोहर पर्रीकर यांनी केले आहे.
काय आहे प्रकरण –
दरम्यान, राफेल घोटाळ्याचे रहस्य मनोहर पर्रिकरांच्या बेडरूम मध्ये असल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. राफेलबाबत पर्रिकरांकडे मोठी माहिती असून ती बाहेर यायला हवी अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केली होती. सुरजेवाला यांनी गोव्याचे आरोग्य मंत्री विश्वजित प्रतापसिंह राणे यांची ऑडिओ क्लिप सादर केली होती. यात राणे हे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकरांच्या बेडरूममध्ये राफेल घोटाळ्याशी संबंधित माहिती असल्याचे सांगत आहेत. मला कोणीही काही करू शकत नाही. माझ्याकडे राफेल घोटाळ्याची माहिती आहे. माझ्या घरातील बेडरूमध्ये यासंबंधित कागदपत्रे आहेत असे पर्रिकर म्हणाल्याचे सुरजेवाला यांनी सांगितले. पर्रिकरांकडे राफेल घोटाळ्याशी संबंधित मोठी माहिती आहे. ती समोर आलीच पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली होती.