‘रावण’ दहनाच्या दिवशी भारताला मिळणार राफेल विमानं, येत्या 2 आठवड्यात हवाई दलाच्या ‘ताफ्यात’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – फ्रेंच लढाऊ विमान राफेल लवकरच भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात सामील होणार आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे स्वतः विमान ताब्यात घेण्यासाठी फ्रान्समध्ये जातील. यापूर्वी ही विमाने 20 सप्टेंबर रोजी भारतात पोहचविण्यात येणार होती, परंतु आता ही तारीख आणखी थोडी पुढे ढकलण्यात आली आहे. आता 8 ऑक्टोबरला भारताला राफेल विमान मिळणार आहे.

8 ऑक्टोबरला वायुसेना दिवस तसेच विजयादशमीही आहे. विजयादशमीला बर्‍याच ठिकाणी शस्त्रांची पूजा केली जाते, अशा दिवसात भारताला या दिवशी सर्वात मोठे शस्त्र मिळणार आहे.यामुळे राफेल विमाने भारताकडे जाण्याची तारीख ऐतिहासिक ठरणार आहे.

राजनाथ सिंह फ्रान्सच्या बोर्डेक्स येथील मॅन्युफॅक्चरिंग प्लँटमध्ये जातील, तेथून राफेल ताब्यात घेण्यात येईल. हवाई दलाची टीम संरक्षणमंत्र्यांसमवेत जाऊन राफेल घेण्याची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करेल . या व्यतिरिक्त हवाई दलाचा फायटर पायलटही या टीमसह फ्रान्सला जाणार आहेत.

विशेष म्हणजे राफेल विमान खरेदी ही गेल्या काही वर्षांत सर्वाधिक चर्चेची आणि वादग्रस्त ठरली आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत केंद्र सरकारवर कॉंग्रेस पक्षाने या डीलमधील घोटाळ्याचा आरोप केला होता. या कराराचा दाखल देत कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी जवळपास प्रत्येक प्रचार रॅलीत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधत राहिले, परंतु त्यांना यश मिळालं नाही.

भारताने सप्टेंबर 2016 मध्ये फ्रान्सबरोबर सामंजस्य करार करत 58 हजार कोटींमध्ये 36 राफेल विमान खरेदी केली होती.