‘राफेल’ आज भारतात दाखल होणार !

पोलिसनामा ऑनलाईन टीम – सुपर फायटर राफेल विमानाची प्रतीक्षा संपली असून आज भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. राफेल विमानाची पहिली तुकडी आज दुपारी अंबाला एअरबेसवर पोहोचणार आहे. याच पार्श्वभूमीवर अंबाला एअरबेसजवळील तीन किमी अंतरावर कडेकोट सुरक्षा तैनात करण्यात आली असून ड्रोन उडवण्यास बंद घालण्यात आली आहे.

अंबाला एअऱबेसवर तीन लढाऊ तर दोन प्रशिक्षित अशा 5 राफेल विमानांची पहिली तुकडी आज पोहोचणार आहे. पूर्व लडाखमध्ये भारत-चीनमधील झालेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ही लढाऊ विमाने भारत-चीन सीमेवर तैनात करण्याबाबत चर्चा सुरू आहेत. 27 जुलै रोजी फ्रान्सच्या मेरिग्नाक एअरबेसवरून ही 5 विमान भारताच्या दिशेने रवाना झाली होती.

सप्टेंबर 2016 रोजीमध्ये फ्रान्सबरोबर झालेल्या करारात भारताने सुमारे 58 हजार कोटींमध्ये 36 राफेल लढाऊ विमान खरेदी करण्याच्या करारावर स्वाक्षरी केली होती. त्यापैकी 30 लढाऊ विमाने तर 6 प्रशिक्षण देणारी विमाने आहेत. राफेलची पहिल्या 5 विमानांची तुकडी आज भारताच्या ताफ्यात दाखल होत आहे. फेब्रुवारी 2021 पर्यंत भारताला राफेलची 36 विमाने भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात दाखल होतील. हवेतूनच जमिनीवर 60 किलोमीटरपर्यंत अचूक निशाणा साधणार्‍या या विमानांमुळे भारतीय हवाई दलाच्या सामर्थ्यात मोठी भर पडणार आहे.