सर्वोच्च न्यायालयाचा महत्वाचा निर्णय ; राफेल करार घोटाळा नाही 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राफेल करारातील ऑफसेट हक्क रिलायन्स डिफेन्सला देण्याच्या निर्णयात आक्षेपार्ह काहीच सापडले नसल्याने फ्रान्सकडून ३६ राफेल जेट विमाने खरेदी करण्याच्या करारात कोणताही गैरव्यवहार आढळलेला नाही म्हणून राफेल कराराला घोटाळा म्हणता येणार नाही असे सर्वोच्च न्यायालयाने आज दिलेल्या निकालात म्हणले आहे. पाच राज्यात पराभवाच्या छायेत गेलेल्या भाजपासाठी सर्वोच्च न्यायालयाने आज मोठा दिलासा दिला आहे.

वायू सेनेची क्षमता वाढवण्यासाठी  फ्रान्सकडून ३६ लढाऊ राफेल विमाने खरेदी करण्याचा करार भारताने केला होता. हा करार ५८ हजार कोटी रुपयांचा होता. मात्र, या करारात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करणाऱ्या जनहित  याचिका माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा आणि अरुण शौरी तसेच ॲड.  एम. एल. शर्मा, ॲड. विनीत धांडा आणि आप नेते संजय सिंह यांनी सर्वोच्च न्यायालयात केल्या होत्या. या घोटाळ्याचा तपास न्यायालयाच्या देखरेखीखाली  करावा, अशी मागणीही याचिकाकर्त्यांनी केली होती. सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या. एस. के. कौल व न्या. के. एम. जोसेफ यांच्या न्यायपीठाने  या याचिकांवर शुक्रवारी निर्णय दिला. राफेल कराराच्या संदर्भातील सर्व अहवाल आणि कागदपत्रे न्यायालयाने तपासून पहिले आहेत तसेच या पूर्वीच्या सुनावणी दरम्यान सर्व याचिकाकर्त्यांची बाजू ऐकून घेतली आहे. त्यानंतर आज सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.

दरम्यान न्यायालयाचा आज निर्णय आल्या बरोबर अनिल अंबांनी यांनी त्या निर्णयाचे स्वागत केले आहे. ” मी न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करतो आहे. आमची कंपनी देशाच्या सुरक्षित कवचाला आधुनिक आणि अधिक मजबूत करण्यासाठी प्रेरित झालेली कंपनी असून आम्ही राफेल विमानाच्या संदर्भात काँग्रेसने राजकीय हव्यासा पोटी केलेले भष्टाचाराचे आरोप स्वतः सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावले आहेत म्हणून मी या निर्णयाचे स्वागत करतो” असे अनिल अंबानी यांच्या वतीने सांगण्यात आले आहे.

राहुल गांधी यांनी राफेल करारावरून मोदी सरकारला धारेवर धरले होते. मोदी सरकारवर लोकसभेत मांडण्यात आलेल्या अविश्वासाच्या ठरावाच्या वेळी राहुल गांधींनी मोदी सरकारवर राफेल कराराच्या भ्रष्टाचारावरून थेट लोकसभेत आरोप ठेवले होते  आणि मोदींना “चोकीदार चोर है” असे म्हणत राळ उडवून दिली होती. अशा परिस्थिती मोदींनी मात्र नेहमी राफेल करारावर मौन बाळगले होते. आज सर्वोच्च न्यायालायने दिलेला निर्णय मोदी सहित भाजपाला सुखावणारा आहे.