‘दु:साहसाचं प्रत्युत्तर मिळणारच’, संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांचा ड्रॅगनला ‘इशारा’

अंबाला : वृत्तसंस्था –    5 राफेल लढाऊ विमानं अंबाला हवाई तळावर औपचारिकरित्या वायुसेनेत सामील झाली आहेत. यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी चीनला इशारा दिला आहे. राफेल गेम चेंजर आणि मल्टी रोल कॅपॅसिटीसोबतच शत्रुला धडा शिकवण्यासाठी सक्षम आहे असंही राजनाथ सिंह यांनी यावेळी म्हटलं आहे.

राजनाथ सिंह म्हणाले, “भारतानं कायमच वसुधैव कुटुंबकम म्हटलं आहे. परंतु सीमेवर कोणत्याही पद्धतीच्या दु:साहसाचं प्रत्युत्तर देण्यासाठीही भारत तयार आहे. राफेलचा वायुदलातील सहभाग सीमा सुरक्षा आणि क्षेत्रीय अखंडता कायम राखण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.”

पुढे बोलताना राजनाथ सिंह म्हणाले, “कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज असल्याचं वायुसेनेनं दाखवून दिलं आहे. फॉरवर्ड सीमेवर तत्काळ विमानं तैनात करून शत्रुला स्पष्ट संदेश देण्यात आला आहे. त्यामुळं आता कोणत्याही पद्धतीच्या हालचाली करण्यापूर्वी शत्रु अनेकदा विचार करेल” असं म्हणत त्यांनी वायु दलाचं कौतुक केलं आहे.

या कार्यक्रमासाठी फ्रान्सच्या संरक्षण मंत्री फ्लोरेन्स पार्ली यादेखील उपस्थित होत्या. राफेलचा भारतीय वायु दलातील समावेश हा भारत आणि फ्रान्स दरम्यान असलेला दृढ संबंध दर्शवतो.