अर्थव्यवस्थेसाठी एकाच व्यक्तीने निर्णय घेणे ‘घातक’, रघुराम राजन यांचा ‘इशारा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. भारताची अर्थव्यवस्था एकच व्यक्ती आपल्या मर्जीप्रमाणे चालवू शकत नाही, भारताची अर्थव्यवस्था खूप मोठी झाली आहे. त्यामुळे कोणी एका व्यक्तीकडून चालवणे अशक्य आहे आणि याचे उदाहरण आपण पाहिले आहे असे स्पष्ट मत रघुराम राजन यांनी नुकतेच व्यक्त केले आहे.

या आधी देखील राजन यांनी अनेकदा याबाबत वक्तव्य केलेले आहे. कोणा एकाच्या हाती अर्थव्यवस्था देणे हे घातक ठरू शकते. तसेच राजकीय गोष्टींमुळे नुकसान झाले तर याचा आपल्या अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो ज्यातून बाहेर पडायला खूप वेळ लागेल. ब्राऊन विद्यालयात व्याख्यान देताना ते बोलत होते. सरकारद्वारे अर्थव्यवस्थेबाबत कोणतेही ठोस पाऊल उचलले न गेल्याने अर्थव्यवस्थेत मंदीचे वातावरण आहे.

2016 मध्ये 9% होता विकास दर
2016 मध्ये 9% च्या आसपास विकासाचा दर होता. जो आता कमी होऊन 5.3 % आला आहे. देशातील अर्थव्यवस्थेला आणि वीज निर्मिती क्षेत्राला मदतीची आवश्यकता आहे. तरीसुद्धा नवीन ठिकाणी विकास दर वाढवण्यावर भर दिला गेला नाही.

जीएसटी, नोटबंदी मोठ्या प्रमाणावर जबाबदार
रघुराम राजन यांनी सांगितले की ही आर्थिक मंदी नोटबंदी आणि त्यानंतर घाईत लागू केलेल्या जीएसटीमुळे आली आहे. जर हे दोन्हीही प्रकार झाले नसते तर अर्थव्यवस्था आज खूप मजबूत असती. सरकारने कोणाचाही सल्ला न घेता नोटबंदी लागू केली. मात्र याबाबत बाकीच्यांनाही विचारात घेणे गरजेचे होते. नोटबंदीमुळे लोकांचे खूप नुकसान झाले आणि यामुळे काहीच साध्य झालेली नाही.

Visit : Policenama.com