Rahu Position in Janma Kundali : आपल्या जन्म कुंडलीत कोणत्या स्थानी आहे ‘राहु’ ? ‘असा’ पडेल तुमच्या आयुष्यावर प्रभाव ! जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन – ज्योतिषशास्त्रात जन्म कुंडली आणि जन्म पत्रिका नेहमीच प्रत्येक व्यक्तीसाठी उत्सुकतेचा विषय राहिली आहे. कारण जन्म कुंडलीत मनुष्याच्या जीवनाचा सार असतो असं सांगितलं जातं. ज्योतिषशास्त्रात राहु हा छाया ग्रह मानला गेला आहे. तो पापकारक असल्याचं सांगितलं जातं. तुमच्या जन्म कुंडलीत राहु कोणत्या स्थानी आहे याचा नेमका कसा प्रभाव असू शकेल हे आज आपण जाणून घेणार आहोत.

1) पहिल्या स्थानी राहु
पहिलं घर हे मंगळ आणि सुर्यानं प्रभावित असतं. हे लग्न स्थान मानलं जातं. जर या स्थानात राहु असेल तर अशा व्यक्ती रागीट आणि स्वार्थी स्वभावाच्या असतात असं सांगितलं जातं. परंतु अशा व्यक्तींचं व्यक्तिमत्व हे अतिशय आकर्षक असतं. समोरच्या व्यक्तीकडून आपलं काम काढून घेण्यात अशा व्यक्तींचा हात कुणीच धरू शकत नाही. मानसिक ताण तणाव आणि नकारात्मक विचारांनी या व्यक्ती ग्रासलेल्या असतात. केवळ स्वत:चा विचार करण्यात त्या व्यक्ती धन्यता मानत असतात.

2) दुसऱ्या स्थानी राहु
ज्यांच्या जन्म कुंडलीत राहु दुसऱ्या स्थानी विराजमान असेल त्या व्यक्तींना आर्थिक चणचण अनेकदा भासत असते. अशा व्यक्ती गरजेपेक्षा जास्त संवाद साधतात, जास्त बोलतात आणि शत्रुंकडून काही ना काही लाभ पदरात पाडून घेणाऱ्या असतात असं सांगितलं जातं. अशा व्यक्तींना वारंवार पोटाच्या समस्यांना सामोरं जावं लागतं. या व्यक्तींना अनेक गोष्टींचं आकर्षण असतं. अशा व्यक्ती गर्विष्ठ आणि कुसंगतीत रमणाऱ्या असतात असं सांगितलं जातं.

3) तृतीय स्थानी राहु
ज्यांच्या जन्म कुंडलीत राहु तिसऱ्या स्थानी असेल अशा व्यक्तींना शिक्षण क्षेत्रात विशेष रुची असते असं सांगितलं जातं. या व्यक्ती पराक्रमी बुद्धिजीवी आणि कायम आशावादी असतात. जन्म कुंडलीत राहु तृतीय स्थानी असणं फलदायी मानलं जातं. या व्यक्ती निर्धारीत ध्येय प्राप्त करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करतात आणि यशस्वी होतात. कितीही समस्या आणि प्रतिकूल परिस्थिती असली तरी आशावादी असल्यानं लक्ष्य पूर्ण करण्यासाठी भरपूर मेहनत, परिश्रम घेत असतात असं सांगितलं जातं.

4) चुतर्थ स्थानी राहु
ज्यांच्या जन्म कुंडलीत राहु चौथ्या स्थानी असतो त्या व्यक्तींच्या मालमत्ता जागा, जमीन यांचे लाभ दर्शवते असं सांगितलं जातं. परंतु अशा व्यक्ती आयुष्यभर असमाधानी असतात. अशा व्यक्तींचे वडिलांसोबतही खास नातेसंबंध नसतात. बहुतांश वेळा ते तणावपूर्ण असतात. अशा व्यक्तींना अनेकदा धनलाभ होतात मात्र ते उपभोगू शकत नाहीत. अशा व्यक्तींना वारंवार आरोग्याच्या तक्रारीनं त्रस्त करत असतात. अशा व्यक्ती आईबाबतही हळव्या असतात असं सांगितलं जातं.

5) पंचम स्थानी राहु
ज्यांच्या जन्म कुंडलीत राहु पाचव्या स्थानी असेल त्या व्यक्तींना अमाप प्रसिद्धी मिळते. परंतु यासोबत त्यांना अहंकाराची बाधा जडते. अनेकदा त्या व्यक्ती विद्या, शिक्षण, व्यापार याबाबत योग्य निर्णय घेऊ शकत नसतात. बहुतांश वेळा या व्यक्ती द्विधा मनस्थितीत असतात. राहु शुभ असेल तर श्रीमंती, बुद्धी आणि आरोग्याचा कारक मानला जातो. अशा व्यक्तींना अभ्यासात उत्तम कामगिरी करण्यासाठी कठोर मेहनत आणि अथक परिश्रम घ्यावे लागतात. अशा व्यक्तींना 30 व्या वर्षानंतर पैसे मिळण्यास सुरुवात होते असं सांगितलं जातं.

6) षष्ठम स्थानी राहु
ज्यांच्या जन्म कुंडलीत राहु सहाव्या स्थानी असेल त्या व्यक्तींना दीर्घायुष्य लाभतं असं सांगितलं जातं. अशा व्यक्ती साहसी असतात. विरोधक आणि हितशत्रू अशा व्यक्तींचं काहीच बिघडवू शकत नाहीत. शत्रुंवर विजय मिळवण्यात अशा व्यक्ती माहिर असतात. या व्यक्तींकडे संयम, प्रबळ इच्छाशक्ती, मानसिक बळ मोठ्या प्रमाणात असतं. कठोर परिश्रम आणि अथक परिश्रम घेण्याची कायमच त्यांची तयारी असते. स्वबळावर यश आणि प्रगती साध्य करण्यासाठी या व्यक्ती सक्षम असतात असं सांगितलं जातं.

7) सप्तम स्थानी राहु
ज्यांच्या जन्म कुंडलीत राहु सातव्या स्थानी असेल त्या व्यक्ती हिशोब, ताळेबंद यात चोख असतात असं सांगितलं जातं. जीवन जगण्याची कला त्यांना अवगत असते. बहुतांश व्यक्ती या आपल्या मर्जीच्या मालक असतात. स्वत:ला वाटेल तेच त्या करतात. अशा व्यक्ती बहुतांश वेळा मनाचा कौल घेऊन निर्णय घेत असतात. अनेकविध गोष्टींचं या व्यक्तींना आकर्षण असतं. अशा व्यक्ती आयुष्याच्या जोडीरादाराची निवड करताना स्वत:सारख्या चतुर व्यक्तीची निवड त्या करतात. या व्यक्तींचं वैवाहिक जीवन उत्तम असतं. पर्यटन, देशाटन, प्रवास करायला या व्यक्तींना खूप आवडतं असं सांगितलं जातं.

8) अष्टम स्थानी राहु
ज्यांच्या जन्म कुंडलीत राहु आठव्या स्थानी असेल त्यांच्या मानसिक स्थितीसाठी तो कष्टकारक, नुकसानकारक मानला जातो. अशा व्यक्ती वरवर उत्तम दिसतात. पंरतु गुप्तरोगानं पीडित असू शकतात. अनेकदा त्या पोटाच्या तक्रारीनं त्रस्त असतात. खूपदा कुटुंबातील व्यक्तीच त्यांची खिल्ली उडवत असतात, उपेक्षा करत असतात असं सांगितलं जातं. अशा व्यक्तींना वारसा हक्काच्या माध्यमातून अनेकदा मोठा धनलाभ होतो. धनसंचयात वृद्धि होते. अशा व्यक्ती धनवान आणि धैर्यवान असतात असं सांगितलं जातं.

9) नवम स्थानी राहु
ज्यांच्या जन्म कुंडलीत राहु नवव्या स्थानी असेल तर अशा व्यक्ती दुष्ट प्रवृत्तीच्या मानल्या जातात. या व्यक्ती अनेकदा समोरच्या व्यक्तीला नुकसान कसं पोहोचवता येईल याचाच विचार करत असतात. या व्यक्ती अनेकदा आपल्या ध्येयापासून भटकत असतात. अशांचे कुटुंबियांशी संबंधही अतिसामान्य असतात. या व्यक्ती व्यापारात फसवल्या जाण्याची शक्यता असते. अशा व्यक्ती दु:खी कष्टी, नास्तिक आणि भटकत राहणाऱ्या असतात असं सांगितलं जातं.

10) दशम स्थानी राहु
ज्यांच्या जन्म कुंडलीत राहु दशम स्थानी असेल त्या व्यक्ती भयहीन असतात असं सांगितलं जातं. कोणत्याही गोष्टीची ते भीती वाटून घेत नाहीत. या व्यक्ती सारासार विचार करून कृती करणाऱ्या असतात. आपलं काम काढून घेण्यात या व्यक्ती माहिर असतात. अशा व्यक्तींचं चित्त कधीच थाऱ्यावर नसतं. मन शांत रहात नाही. जीवनात सतत काही ना काही करण्याची त्यांची मानसिकता आणि मनोकामना असते. अशा व्यक्तींना मातृसुखाचा लाभ घेता येत नाही असं सांगितलं जातं.

11) एकादश स्थानी राहु
जर जन्म कुंडलीत राहु अकराव्या स्थानी असेल तर ते शुभ मानलं जातं. अशा व्यक्ती धनवान आणि संपत्तीकारक मानल्या जातात. या व्यक्तींना अमाप प्रसिद्धी मिळते. व्यवसाय आणि व्यापारात या व्यक्ती अतिशय यशस्वी होतात. परंतु अशा व्यक्तींना मुलांचं सुख मिळतंच असं नाही. म्हणजे मुलांमुळं त्यांना अनेक कष्ट सोसावे लागू शकतात. अशा व्यक्ती शिक्षण पूर्ण करतातच असं नाही. भौतिक सुखात कोणतीच कमतरता रहात नाही. अशा व्यक्ती अन्य व्यक्तींच्या सल्ल्यामुळं अनेक लाभ प्राप्त करून घेण्यात यशस्वी होत असतात असं सांगितलं जातं.

12) द्वादश स्थानी राहु
जर जन्म कुंडलीत राहु बाराव्या स्थानी विराजमान असेल तर हे अशुभ मानलं जातं. आयुष्याच्या सुरुवातीलाच म्हणजे लहानपणीच या व्यक्तींना आजारपणाला सामोरं जावं लागतं. त्यांना जीवनात अनेक प्रकारचे भोग, दु:खं भोगावं लागतं. परंतु जीवनातील पुढील बहुतांश टप्प्यावर या व्यक्ती उत्तम यश आणि प्रगती साध्य करतात. रागीट आणि वाद घालणाऱ्या व्यक्तींशी यांचा अनेकदा सामना होत असतो. हितशत्रू आणि विरोधक नेहमीच यांच्यावर कडी करण्याचा प्रयत्न करत असतात. काही वेळा हा प्रयत्न यशस्वी होतो. अनेकदा अशा व्यक्तींच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर असतो असं सांगितलं जातं.