राहुल गांधी ‘अमूल बेबी’ ; या माजी मुख्यमंत्र्याने उडवली खिल्ली

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ‘पप्पू’नंतर आता राहुल यांचा उल्लेख ‘अमुल बेबी’ असा करण्यात आला आहे. सीपीएमचे ज्येष्ठ नेते आणि केरळचे माजी मुख्यमंत्री व्हीएस अच्युतनंदन यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. राहुल यांचा उल्लेख अमूल बेबी असा करत त्याच्यावर हल्ला चढवला आहे. राहुल हे केरळमधील वायानाड मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. त्याच्या या निर्णयावरच त्यांनी फेसबुकच्या माध्यमातून टिका केली आहे.

अच्युतनंदन म्हणाले की, वायानाडमधून लढण्याचा निर्णय हा राहुल गांधींची राजकीय अपरिपक्वता दाखवतो. राहुल गांधी वायानाडमधून लढल्यामुळे डावे पक्ष विरुद्ध राहुल आणि भाजप अशी लढत होईल. राहुल यांना जसे वाटते तसे इथे काँग्रेस-भाजप लढत होणार नाही. त्यामुळेच त्याचा उल्लेख मी अमुल बेबी असे केल्याचा खुलासा त्यांनी केला.

याचबरोबर सीपीआयएमकडून यापूर्वीदेखिल राहुल यांच्या वायनाडमधून निवडणूक लढण्याच्या निर्णयाविरोधात त्यांच्या देशाभीमानी या मुखपत्रातून टिका करण्यात आली होती. त्यावेळी राहुल यांच्या निर्णयाची पप्पू स्ट्राईक अशी खिल्ली उडवली होती.

राहुल गांधी यांनी अमेठीसह वायानाडमधूनही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. येथे थेट भाजपशी टक्कर होईल, असा काँग्रेसचा अंदाज आहे. पण इथे सीपीएमशी खरी लढत असेल असे सीपीआयएमचं म्हणणं आहे.