‘त्या’ आठ जागांचा तिढा सोडवण्यासाठी राहुल गांधी आणि शरद पवार यांच्यात दिल्लीत खलबत 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा अगदी तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्रासह देशात राजकीय हालचालींना वेग आला आहे. तर महाराष्ट्रात आघाडीसाठी समीकरणंही जुळु लागली आहेत. मोदी सरकारला मात करण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीत मोठ्या प्रमाणात हालचाली सुरु झाल्या आहेत.

याच पार्श्वभूमिवर नवी दिल्लीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची बैठक होणार आहे. या बैठकीत राज्यातील लोकसभेच्या जागा वाटपाबाबत चर्चा होणार आहे. या बैठकीत काँग्रेसचे राज्याचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे आणि राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल या बैठकीला उपस्थित असणार आहेत.

महाराष्ट्रात लोकसभेच्या 8 जागांसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीत  काही मतभेद आहेत. या जागा कोण लढवणार याबाबत चर्चा सुरु आहे. त्यामुळे दोन्ही पक्षाच्या ज्येष्ठ आणि अनुभवी नेत्यांच्या बैठकीत याचा निकाल लागतो की नाही हे पाहणेही महत्त्वाचे आहे.

पुणे, यवतमाळ, नंदुरबार, रत्नागिरी, औरंगाबाद हे मतदार संघ काँग्रेसकडे आहेत. नगरमधील लोकसभेच्या जागेबाबतही काँग्रेस-राष्ट्रवादीत तेढ आहे. त्यामुळे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे पाटील हे लोकसभा लढवण्याच्या तयारीत आहेत. परंतु, ही जागा राष्ट्रवादीकडे आहे.

दरम्यान, या बैठकीनंतर काय निर्णय होतोय हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे. त्यासोबत राष्ट्रवादी सुजय विखे पाटलांसाठी जागा सोडणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.