Mission Shakti : राहुल गांधींकडून शास्त्रज्ञांचं अभिनंदन तर मोदींना टोमणा

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन – भारताने अँटी सॅटेलाईट मिसाईल लाँच केले आहे. सॅटेलाईट पाडणारा भारत चौथा देश ठरला आहे, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. भारतीय शास्त्रज्ञांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी अभिनंदन केले आहे.

राहुल गांधींनी डीआरडीओच्या शास्त्रज्ञांचे अभिनंदन करताना मोदींना टोमणा हाणला आहे. त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं की, वेल डन डीआरडीओ, तुमच्या कार्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. मात्र, राहुल गांधी यांनी या यशाचं श्रेय मोदींना देणं टाळले आहे. कारण याच ट्विटमध्ये त्यांनी मोदींना ‘वर्ल्ड थियएटर डे’ (जागतिक रंगभूमी दिन) च्या शुभेच्छा दिल्या.

काँग्रेसची प्रतिक्रिया –

काँगेसने ट्विटद्वारे भारतीय अंतराळ विज्ञान संसंस्थेचे अभिनंदन केले. याबरोबरच माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या कर्तृत्वाची आठवण करून द्यायला ही काँग्रेस विसरलेली नाही. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे की, “भारताने केलेल्या नव्या कामगिरीबाबत आम्ही इस्त्रोचे आणि सरकारचे अभिनंदन करीत आहोत. १९६१ साली माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु आणि भारतीय अंतरिक्ष संशोधन संस्था यांच्या वतीने भारतीय अंतरिक्ष कार्यक्रमाची स्थापना करण्यात आली होती. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्याला चालना दिली. अशा आशयाचे ट्विट काँग्रेसच्या वतीने करण्यात आले आहे.

मिशन शक्ती –

अंतरिक्षात ३०० किमी अतंरवरील सॅटेलाइट भारताने उद्ध्वस्त केला. भारताने स्वत:चाच सॅटेलाइट नष्ट केला. यातून भारताने अंतराळातील आपली पोहोच जगातील देशांना दाखवली आहे. सॅटेलाइट पाडण्याचे किंवा अशा प्रकारची चाचणी ही युद्धावेळी वापरली जाते. शत्रू राष्ट्रावर धाक बसवण्यासाठी भारताने मिशन शक्ती केले. ही चाचणी करत असताना कोणत्याही आंतरराष्ट्रीय नियम किंवा संधीचे भारताने उल्लंघन केलं नाही. भारतीय वैज्ञानिकांच्या या कामगिरीचं सर्वच स्तरातून कौतुक आणि अभिनंदन केलं जात आहे.