चीननं जमीन हडपली, भागवत यांना माहितीय पण सत्याचा ‘सामना’ करण्यास घाबरतात, राहुल गांधींचा पलटवार

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : कॉंग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केंद्र सरकार आणि संघ प्रमुख मोहन भागवत यांच्यावर हल्ला केला असून ते म्हणाले की, चीनने आपली जमीन ताब्यात घेतली आहे आणि भारत सरकारने आणि आरएसएसने तसे होऊ दिले आहे.

राहुल गांधी यांचे हे विधान संघ प्रमुखांच्या त्या वक्तव्यावर आले आहे जेव्हा ते आज (रविवारी) नागपुरात झालेल्या शस्त्रपूजनानंतर आपल्या भाषणात म्हणाले की, ‘कोरोना काळात चीनने आपल्या सामरिक बळाच्या अभिमानाने… आपल्या सीमांवर जे अतिक्रमण केले… आणि ज्या पद्धतीने व्यवहार केला आणि करत आहे… केवळ आपल्यासोबतच नाही… संपूर्ण जगासोबत… हे संपूर्ण जगासमोर स्पष्ट झाले आहे.’

राहुल गांधींनी एएनआयच्या एका ट्विटला रीट्वीट करत म्हटले की, कुठे ना कुठे भागवतांना सत्य काय आहे ते माहित आहे, परंतु याचा सामना करण्याची त्यांना भीती वाटत आहे.

नागपुरमध्ये संबोधित करताना मोहन भागवत म्हणाले होते की यावेळी भारताने चीनला ज्या प्रकारे प्रतिसाद दिला आहे, त्याने चीन अस्वस्थ झाला, भारताच्या प्रतिसादामुळे चीनला धक्का बसला. मोहन भागवत म्हणाले की, भारत चीनसमोर छाती काढून उभा राहिला. भारतीय सैन्याने आपले शौर्य दाखवले, सामरिक आणि आर्थिक अशा दोन्ही दृष्टींनी चीन हतबल होईल एवढा धक्का तर चीनला मिळाला आहे.

मोहन भागवत म्हणाले की, भारताची वृत्ती पाहिल्यानंतर जगातील इतर देशांनीही चीनला फटकारण्यास सुरवात केली आहे. त्याच्या समोर उभे राहण्यास सुरवात केली आहे. म्हणून आपण सावध असणे आवश्यक आहे. कारण या प्रतिसादात तो काय करेल हे आपल्याला ठाऊक नाही, म्हणून आपण सतत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.