‘राहुल गांधींचा पराभव करणारच’ ; ‘या’ मुख्यमंत्र्याने घेतली शपथ

तिरूअनंतपुरम : वृत्तसंस्था – काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी अमेठीसह केरळमधील वायनाड या मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावर उलट-सुलट राजकीय प्रतिक्रिया देखील पुढे येत आहेत. दरम्यान, केरळचे मुख्यमंत्री के. विजयन यांना देखील हे पटले नाही. त्यामुळे त्यांनी आपली नाराजी व्यक्त करताना राहुल गांधी यांचा पराभव करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे म्हटले आहे.

राहुल गांधींनी डाव्यांना आव्हान दिलं असून त्यांनी भाजपाविरोधात लढायला हवं होतं. पण, ते आता डाव्यांना आव्हान देत आहेत अशी प्रतिक्रिया के. विजयन यांनी दिली आहे. शिवाय, प्रकाश करात यांनी देखील राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. 2014 च्या निवडणुकीमध्ये राहुल गांधी यांना श्रृती इराणी यांनी आव्हान दिलं होते. आता 2019मध्ये देखील स्मृती इराणी राहुल गांधी यांना आव्हान देणार आहेत.

भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी राहुल गांधी यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. अमित शहा एका सभेत म्हणाले, मी व्हॉट्सअ‍ॅपवर राहुल गांधी वायनाड या ठिकाणीहून देखील लढणार असल्याचं वाचलं. त्यांना केरळमधून का लढावं लागत आहे? राहुल गांधी यांनी अमेठीसाठी काय केलं हे तुम्हा सर्वांना माहित आहे. त्यामुळे आता राहुल गांधी यांना वायनाड या ठिकाणीहून लढायचं आहे. असा शब्दात अमित शहा यांनी राहुल गांधींना लक्ष्य केलं.