राहुल गांधी राजीनाम्यावर ठाम ; काँग्रेस नेते ‘चिंताग्रस्त’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारूण पराभव झाला. या पराभवाची जबाबदारी घेत काँग्रेसाध्यक्ष राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा प्रस्ताव मांडला. तेव्हापासून पक्षाची कार्यकारणी मोठ्या पेचात पडली आहे. कार्यकारणीने राहुल गांधींचा राजीनामा फेटाळला आहे. मात्र राहुल गांधी हे त्यांच्या राजीनाम्यावर ठाम आहेत. त्यामुळे कर्नाटक आणि राजस्थान या दोन्ही राज्यातील राजकीय घडामोडींना नवे वळण लागले आहे. त्यामुळे येथील काँग्रेसची सत्ता धोक्यात येते की काय, या चिंतेत काँग्रेस नेते आहेत.

लोकसभेत काँग्रेसच्या पराभावामुळे राहुल गांधींनी राजीनाम्याचा निर्णय घेतला. मात्र त्याचा परिणाम कार्नाटक आणि राजस्थानमध्ये असलेल्या सत्तेवर होत आहे, असंच वाटत आहे. राहुल गांधी राजीनाम्यावर ठाम आहेत. मात्र त्यांच्या या निर्णयाने पक्षात संभ्रमावस्था आहे. त्यात कर्नाटकमधील काँग्रेस आमदार रमेश जरकिहोली आणि डॉ. सुधाकर यांनी अन्य काही पक्षनेत्यांसह भाजपचे नेते एस. एम. कृष्णा यांची त्यांच्या बेंगळुरूतील निवासस्थानी रविवारी भेट घेऊन काँग्रेस सरकार पाडण्याबाबत चर्चा झाल्याची बातमी समोर येत आहे. तर राजस्थानमधील काँग्रेसमध्येही अंतर्गत नाराजी उफाळून आली आहे. मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी पक्षापेक्षा आपल्या मुलाच्या निवडणुकीसाठीच जोर लावल्याच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर, या पराभवाची जबाबदारी निश्चित करून संबंधित नेत्यांवर कारवाई करावी, अशी मागणी राज्यातील अनेक मंत्रीच करू लागले आहेत.

दरम्यान, राहुल गांधींच्या राजीनाम्याच्या निर्णयानंतर पक्षात अनेक घडामोडी घडत आहेत. राहुल गांधी यांनी मौन घेतले आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या ५५व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांनी शांतीवन येथे जाऊन श्रद्धांजली वाहिली. मात्र कुणाशीही, काहीही न बोलता ते तिथून निघून गेले. ते कोणाचेही फोन घेत नसून त्यांनी सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. काही नवनिर्वाचित खासदारांना भेटण्यासही त्यांनी नकार दिला.