आश्‍चर्य ! शिवसेनेची राहुल गांधी, प्रियंका यांच्यावर स्तुतीसुमने

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – देशात सध्या सर्वत्र माध्यमं आणि एजन्सी ने वर्तवलेल्या एक्झिट पोलचा बोलबाला आहे. देशात भाजप -शिवसेना महायुतीला ३०० जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. असे असताना राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी मेहेनत नक्कीच घेतली. त्यांनी त्यांचे युद्ध एकहाती लढले. अशी स्तुतीसुमने शिवसेनेने उधळली आहेत. शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’तुन राहुल, प्रियांका गांधी यांचे कौतुक करण्यात आले आहे.

राहुल गांधींचे ‘सामना’तून कौतुक

राहुल गांधी व प्रियांका गांधी यांनी मेहनत नक्कीच घेतली. त्यांनी त्यांचे युद्ध एकहाती लढले. एक मजबूत विरोधी पक्ष म्हणून ते यशस्वी होतील. २०१४ साली त्यांच्या पक्षाला लोकसभेत विरोधी पक्ष नेमता येईल इतकेही खासदार निवडून आणता आले नव्हते. या वेळी लोकसभेत काँग्रेसचा विरोधी पक्षनेता असेल हेसुद्धा राहुल गांधी यांचे यशच मानावे लागेल, अशी स्तुती शिवसेनेकडून करण्यात आली आहे.

२३ लाच पाहू !

लोकसभा निवडणुकीचा निकाल २३ मे रोजी जाहीर होणार असून, त्यापूर्वी प्रसिद्ध झालेल्या एक्झिट पोलमध्ये पुन्हा भाजपप्रणित एनडीएचे सरकार येण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. भाजपचा घटकपक्ष असलेल्या शिवसेनेने २३ लाच पाहू ! या मथळ्याखाली ‘सामना’ या आपल्या मुखपत्रात अग्रलेख लिहून कोण याबाबत २३ तारखेला फैसला होईल असे म्हटले आहे.

मोदी सरकार येणार हे सांगण्यासाठी पंडितांची गरज नव्हतीच

शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे, की ‘२०१९ साली पुन्हा एकदा मोदींचेच सरकार येईल हे सांगण्यासाठी कुणा पंडिताची गरज नव्हतीच. यंदाची निवडणूक लोकांनीच जणू हातात घेतली व मोदी यांना भरभरून मतदान केले. राजस्थान, मध्य प्रदेश व छत्तीसगढसारख्या राज्यांत काँग्रेसची सरकारे आहेत. त्या राज्यांतील चाचण्यांतही मोदी यांनाच आघाडी मिळत आहे. एकूणच राष्ट्रीय पातळीवरील ‘एक्झिट पोल’मधून देशाचा कौल स्पष्ट होत आहे. अपेक्षेप्रमाणे काँग्रेसने हा ‘कौल’ नाकारला आहे. २३ लाच काय ते बघू असे सांगितले. त्यांचे म्हणणेदेखील खरे आहे. २३ तारखेस ‘ईव्हीएम’ची कुलपे उघडली जातील व दुपारपर्यंत कोण उसळले, कोण आपटले याचा फैसला होईल. तोपर्यंत जो तो ‘आम्हीच येणार, आमच्याशिवाय आहेच कोण?’ असा दावा करायला मोकळा आहे. आम्ही स्वतः खात्रीने सांगतो की, नरेंद्र मोदी हेच पुन्हा एकदा पंतप्रधान होत आहेत व काँग्रेस पक्षासह त्यांची आघाडी कुचकामी ठरणार आहे. महाराष्ट्रात शिवसेना-भाजपास ऐतिहासिक विजय मिळेल. आम्ही मतदानानंतरच्या चाचण्यांवर जाऊ इच्छित नाही, तर लोकांचा जो उत्साह आम्ही पाहिला त्यानंतर महाराष्ट्राचा कल आणि कौल स्पष्टच झाला होता.