‘माझे नाव राहुल सावरकर नाही’, मरेल पण माफी मागणार नाही

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ‘माझे नाव राहुल सावरकर नाही, राहुल गांधी आहे त्यामुळे केलेल्या विधानाबाबत मी माफी मागणार नाही’ अशी गर्जना राहुल गांधी यांनी दिल्लीच्या रामलीला मैदानावर केली. काँग्रेसने सुरु केलेल्या भारत बचाव रॅली या आंदोलनादरम्यान राहुल गांधी बोलत होते.

काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी ‘रेप इन इंडिया’ असा वाक्यप्रयोग केला होता त्यावरून राहुल गांधी यांनी लोकसभेत माफी मागावी अशी मागणी भाजपच्या महिला खासदारांनी केली होती त्यानंतर आता राहुल गांधी यांनी आक्रमक होत मी माफी मागणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. एवढेच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी जनतेची माफी मागायला हवी असे स्पष्ट मत राहुल गांधी यांनी यावेळी मांडले.

अर्थव्यवस्था ही आपल्या देशाची खूप मोठी शक्ती होती, म्हणून आपल्याकडे सर्व जग पहात होते, मात्र नरेंद्र मोदींनी देशाची अर्थव्यवस्था संपवली असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी यावेळी केला. एवढेच काय पण नरेंद्र मोदी यांनी केवळ अदानी सारख्या व्यावसायिकाला लाखो कोटींची कामे दिली असल्याचा आरोप देखील राहुल गांधी यांनी केला.

भाजपवर खोचक टीका –
काँग्रेसद्वारे राम लीला मैदानावर ‘भारत बचाव रॅली’चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना राहुल गांधी यांनी भाजपवर सडकून टीका केली. नरेंद्र मोदी यांच्या नोटबंदी निर्णयापासून ते शेतकऱ्यांच्या आत्महत्येपर्यंत सर्व गोष्टींसाठी राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर टीका केली. तसेच भाजपने सर्वात मोठी बेरोजगारी आणली असल्याचे देखील यावेळी राहुल गांधी यांनी सांगितले.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/