आप-काँग्रेसची आघाडी फिस्कटली

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीसोबत आघाडी करण्यास नकार दिला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी याबाबत माहिती दिली आहे. राहुल गांधींची मी नुकतीच भेट घेतली. त्यांनी आपसोबत हातमिळवणी करण्यास नकार दिला आहे. असे अरविंद केजरीवाल यांनी सांगितले. आज (सोमवार दि 1 एप्रिल) विमानतळावर ते पत्रकारांशी बोलत असताना त्यांनी याबाबत माहिती दिली.

‘शीला दीक्षित महत्त्वाच्या नेत्या नाहीत’
अरविंद केजरीवाल यांनी आघाडीसाठी माझ्याशी संपर्क साधला नाही असे विधान शीला दीक्षित यांनी केले होते. याबाबत केजरीवाल यांना विचारले असता केजरीवाल म्हणाले की, “आम्ही राहुल गांधींची भेट घेतली आहे. शीला दीक्षित या महत्त्वाच्या नेत्या नाहीत.” असंही यावेळी केजरीवाल यांनी म्हटलं आहे. दरम्यान भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी दिल्लीमध्ये आप-काँग्रेस आघाडीसाठी केजरीवाल इच्छुक असून त्या दृष्टीकोनातून ते प्रयत्न करत आहेत.

आघाडीतून काँग्रेसला तसाही मोठा राजकीय फायदा मिळणार नव्हता
शीला दीक्षित आणि तीन कार्यकारी अध्यक्षांचा आपसोबत आघाडीला विरोध होता. त्यामुळे आपसोबत आघाडी करण्यावर दिल्ली काँग्रेसमध्ये मतभेद असल्याचं दिसून आलं होतं. आघाडी केल्यानंतर 2020 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आपचा सामना कसा करणार ? असा मुख्य प्रश्न होता. दरम्यान आप-काँग्रेस आघाडीतून काँग्रेसला तसाही मोठा राजकीय फायदा मिळणार नव्हता असेही बोलले जात आहे.