मोदी-शाह यांनीच युवकांचं भविष्य उद्ध्वस्त केलं : राहुल गांधी

नवी मुंबई : वृत्तसंस्था – राहुल गांधींनी देशाची ढासळती अर्थव्यवस्था, एनआरसी आणि सुधारित नागरिकत्व कायदा यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे. सध्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्यासंदर्भात देशभरात सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनावर बोलताना राहुल गांधी म्हणाले, “रोजगाराच्या प्रश्नांमुळे मोदी सरकार तुमच्या रागाचा सामना करू शकत नाही. मोदी आणि शाह यांनी तुमचं भविष्य उद्ध्वस्त केलं आहे,” असा आरोप राहुल यांनी मोदी-शाह वर केला आहे.

गेल्या आठवड्यात पंतप्रधानांचे माजी मुख्य आर्थिक सल्लागार डॉ. अरविंद सुब्रमण्यम यांनी अर्थव्यवस्था आयसीयूमध्ये असल्याचं स्पष्ट करत चिंता व्यक्त केली होती. त्यानंतर विरोधकांनी मोदी सरकारला धारेवर धरत लक्ष्य केलं होतं. अशातच भाजपानं एक मोठा निर्णय घेतला तो म्हणजे नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाचा. या कायद्यावरून ईशान्येकडील राज्यांसह संपूर्ण देशभरात विरोध होऊ लागला आहे. दिल्लीत विद्यार्थ्यांनी काढलेल्या आंदोलनानंतर देशभरात त्याचे पडसाद उमटले. परिणामी आज देशभरातील युवक वर्ग या कायद्याच्या विरोधात आंदोलनं पुकारत आहे.

या तरुणांच्या आंदोलनावर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ट्विट करून भाष्य केले की, “मोदी आणि शाह यांनी तुमचं भविष्य उद्ध्वस्त केलं आहे. अर्थव्यवस्थेला पोहोचवलेली हानी आणि घटलेल्या रोजगारामुळे मोदी सरकार तरुणांच्या रागाला सामोरं जाऊ शकत नाही. त्यामुळे ते आपल्या प्रिय असलेल्या भारतामध्ये फूट पडण्याचा प्रयत्न करत आहेत. आपण सर्वांनी एकत्र येऊन भारतीयाविषयी प्रेम व्यक्त करून त्यांचा पराभव करू शकतो,” असं राहुल गांधी यांनी ट्विट केले आहे.

राहुल गांधी यांच्याबरोबरच अनेक नेत्यांनी या कायद्याला आपला विरोध दर्शविला आहे. तसेच माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनीही अर्थव्यवस्थेवरून मोदी सरकारवर जोरदार टीका केली होती. “कॉर्पोरेट टॅक्स कमी करण्यासह जे उपाय सरकारनं केले आहेत, ते त्यांच्या जवळ असलेल्या उद्योजकांना मदत करणारे आहेत. खरतर ज्यांचे उत्पन्नाचे स्त्रोत गेले, नोकऱ्या गेल्या, कमी उत्पन्न असणाऱ्यांना मदत करण्याची ही वेळ आहे. तळाला असणाऱ्या २५ ते ३५ कामगार वर्गाला मदत करण्याची वेळ आहे. पण, सरकारनं केवळ ८०० कंपन्यांना मदत केली,” असं चिदंबरम यांनी म्हटलं होतं. एकंदरीतच काँग्रेस कडून ढासळलेली अर्थव्यवस्था, एनआरसी आणि सुधारित नागरिकत्व कायदा संदर्भात मोठ्या प्रमाणात विरोध होत असून भाजपाच्या चिंतेत भर पडली आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/