मोदी सरकारनं गरिबांसाठी जाहीर केलं ‘पॅकेज’, राहुल गांधी म्हणाले पहिलं योग्य ‘पाऊल’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : कोरोना विषाणूच्या गंभीर टप्प्यात असलेल्या देशातील गरीब वर्गासाठी मोदी सरकारने गुरुवारी मदत पॅकेज जाहीर केले. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी यासाठी १.७० लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यानंतर कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी सरकारच्या या निर्णयाचे कौतुक केले आणि ट्विट केले की सरकारने जाहीर केलेले मदत पॅकेज हे सरकारने टाकलेले पहिले योग्य पाऊल आहे.

राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे की, ‘सध्याच्या लॉकडाउनमुळे शेतकरी, दैनंदिन मजूर, कामगार, महिला आणि वृद्ध लोक वाईट काळाला सामोरे जात आहेत. भारत त्यांचा कर्जदार आहे. अशा परिस्थितीत हे मदत पॅकेज म्हणजे सरकारने टाकलेले पहिलेच योग्य पाऊल आहे.

१.७० लाख कोटीचे मदत पॅकेज

कोरोना विषाणूच्या संकटाला सामोरे जाण्यासाठी सरकारने मदत पॅकेज जाहीर केले आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी गरीब, मजूर आणि कर्मचार्‍यांसाठी १.७० लाख कोटींचे पॅकेज जाहीर केले. प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज असे त्याचे नाव आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत गरीबांना रोख रक्कम हस्तांतरित केली जाईल. याशिवाय, ३ महिन्यांपर्यंत कर्मचारी आणि मालक या दोघांच्या वाट्याचे योगदान सरकार देईल.

विमा संरक्षण देखील देण्यात येईल

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केलेल्या पॅकेजअंतर्गत कोरोना विषाणूची लागण झालेल्या लोकांच्या उपचारांमध्ये गुंतलेल्या डॉक्टर, पॅरामेडिकल कर्मचार्‍यांना, वैद्यकीय सेवा कर्मचार्‍यांना प्रति कुटूंबासाठी ५० लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्यात येणार आहे. त्याशिवाय रेशन दुकानांतून ८० कोटी कुटुंबांना अतिरिक्त ५ किलो गहू अथवा तांदूळ बरोबरच १ किलो डाळ तीन महिन्यांपर्यंत विनामूल्य उपलब्ध करुन देण्यात येणार आहे आणि महिला, विधवा आणि वृद्धांना आर्थिक मदत दिली जाणार आहे.