राहुलजी तुमच्या भाषेला मर्यादा असू द्या ! सुषमा स्वराज यांचे राहुल गांधींना खडे बोल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – महाराष्ट्रात झालेल्या सभेदरम्यान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदींवर टीका केली. मोदी कुठलंच नातं मानत नाहीत त्यांनी आपल्या गुरूला म्हणजेच लालकृष्ण आडवाणी यांना बुटांनी मारून स्टेजवरून खाली फेकलं आहे असे वक्तव्य राहुल गांधी यांनी केले होते. आता त्यांच्या या वक्तव्यावरून केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांनी राहुल गांधींना खडे बोल सुनावले आहेत. स्वराज यांनी ट्विट करून राहुल गांधी यांना मर्यादा संभाळून शब्दांचा वापर करा असे म्हंटले आहे.

सुषमा स्वराज यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे की, ‘अडवाणी हे आम्हाला पितृतुल्य आहेत. त्यांच्याबद्दल राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यामुळं आम्हाला वेदना झाल्या आहेत. त्यांनी भाषेचा वापर करताना मर्यादा पाळाव्यात असं सुषमा स्वराज यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

नक्की काय म्हणाले होते राहुल गांधी ?

सध्याच्या भाजपामध्ये ज्येष्ठ नेत्यांचा आदर केला जात नाही. मोदी आणि अडवाणींचे नाते गुरु शिष्याचे आहे. मात्र, मोदींनी त्यांना डावलले. ‘हिंदू धर्मात गुरू-शिष्याच्या नात्याला विशेष महत्त्व आहे. आडवाणी हे मोदींचे गुरू आहेत. मात्र, मोदी कुठलंही नातं मानत नाहीत. गुरू समोर आल्यानंतर साधे हातही जोडत नाहीत. त्यांनी आपल्या गुरूला बूटांनी मारून स्टेजवरून खाली फेकलं आहे,’ असा टोला राहुल गांधी यांनी लगावला होता त्यावर सुषमा स्वराज यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.