Rahul Gandhi : ‘लस, ऑक्सिजन आणि औषधांसोबत पंतप्रधानही गायब’

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – देशभरात कोरोना व्हायरसचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ही रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. देशभरात लसीकरणाची व्याप्तीही वाढवण्यात आली आहे. पण अनेक राज्यांत लसींचा मोठा तुटवडा जाणवत आहे. त्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. त्यानंतर आता काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनी टीकास्त्र सोडले.

देशात वाढती रुग्णसंख्या चिंतेचे विषय ठरत आहे. आरोग्ययंत्रणांवर याचा ताण येत आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच आरोग्य सेवा-सुविधांचा तुटवडा यासर्व बाबींमुळे आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. त्यानंतर आता राहुल गांधी यांनी ट्विट करून निशाणा साधला. त्यांनी म्हटले की, ‘लस, ऑक्सिजन आणि औषधांसोबत पंतप्रधानही गायब आहेत. उरलं आहे तर फक्त सेंट्रल विस्टा, औषधांवर जीएसटी आणि जिथे तिथे पंतप्रधानांचे फोटो’.

दरम्यान, लसीच्या कमतरतेमुळे अनेक राज्यांनी 18 ते 44 वयोगटातील लसीकरण बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या सर्वांवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. राहुल गांधी यांच्यासह अन्य पक्षांनीही सेंट्रल विस्टा प्रकल्पावर खर्च करण्यात येणारा पैसा हा आरोग्य व्यवस्थेसाठी वापरण्याचा सल्ला दिला होता.