‘त्यांना’ कोणीही ठार मारले नाही, ते आपोआप मेले : राहुल गांधी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – संशयास्पदरित्या मृत्यू झालेल्या व मृत्यूचे गूढ कायम असलेल्या सात व्यक्तींची यादी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्वीट केली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे. यांना कोणीही ठार मारले नाही, ते फक्त मेले असे खोचकपणे नमूद करत राहुल गांधी यांनी सात व्यक्तींची नावे दिली आहेत. राहुल यांनी या ट्वीटद्वारे नरेंद्र मोदी व अमित शहा यांना टार्गेट केल्याने भाजप समर्थकांनी त्यांनाही ट्वीटरवर लक्ष्य केले आहे.

या ट्विटमध्ये तुलसीराम प्रजापती, सोहारुबुद्दीन शेख, कौसर बी, जस्टिस लोया, हरेन पांड्या, प्रकाश ठोंबरे, श्रीकांत खांडलकर अशी ७ नावे नमूद करण्यात आली आहेत. या सर्वांच्या मृत्यूंचे गूढ कायम आहे. या सर्वांना कोणीही ठार केलेले नाही, त्यांचा मृत्यू झाला, अशा आशयाचे ट्विट राहुल गांधींनी केले आहे. जी सात नावे राहुल यांनी प्रसिद्ध केली आहेत त्यातील मृत व्यक्तींच्या मृत्यूप्रकरणात मोदी, शहा यांचीही नावे घेतली गेली होती.

सोहराबुद्दीन बनावट चकमक प्रकरणामध्ये ३८ लोकांवर हत्येचे आरोप होते. त्यापैकी १५ जणांना २०१४च्या सुनावणीत दोषमुक्त करण्यात आले होते. त्यामध्ये अमित शहा आणि १४ पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश होता. अमित शाह त्यावेळी गुजरातचे गृहमंत्री होते. घटनेच्या सुनावणीमध्ये तक्रारदार पक्षाच्या जवळपास ९२ साक्षीदारांनी साक्षी पलटवल्या होत्या.

सोहराबुद्दीन आणि त्याची पत्नी कौसर बी यांना गुजरात पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने पकडले होते. पाकिस्तानातील लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेशी सोहराबुद्दीनचे संबंध असल्याचा दावा गुजरात पोलिसांनी केला होता. सीबीआयच्या आरोप पत्रानुसार सोहराबुद्दीन आणि त्याची पत्नी कौसर बी यांचे गुजरात आणि राजस्थान पोलिसांनी २२ आणि २३ नोव्हेंबरला बसमधून अपहरण केले होते. त्यावेळी ते रात्री हैदराबाद येथून सांगलीला येत होते. त्यानंतर २६ नोव्हेंबर २००५ ला अहमदाबाद येथे चकमकीमध्ये तो ठार झाला होता.
ही चकमक बनावट असून याचे नियोजन करण्यात गुजरातचे तत्कालीन गृह राज्यमंत्री अमित शाह यांचा सहभाग होता, असा आरोप होता.

तुलसीराम प्रजापती हा या प्रकरणातला मुख्य साक्षीदार होता. त्याला गुजरात आणि राजस्थानच्या काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या इशाऱ्यांवर २००६ साली चकमकीत ठार करण्यात आले होते. डिसेंबर २०१४ मध्ये न्यायालयाने अमित शाह यांना सोहराबुद्दीन प्रकरणातून आरोपमुक्त केले होते. गुजरातचे माजी गृहमंत्री हरेन पंड्या यांचीही याच प्रकरणात हत्या करण्यात आली होती.