राहुल गांधींचा मीडियावर ‘फॅसिस्ट’ असल्याचा आरोप, आता व्हिडिओद्वारे शेअर करणार ‘विचार’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एका ट्विटमध्ये राहुल गांधी यांनी भारताच्या वृत्त माध्यमांवर फॅसिस्ट हितसंबंधांसाठी काम करत असल्याचा आरोप केला आहे. आता राहुल यांनी दररोज व्हिडीओच्या माध्यमातून सोशल मीडियावर आपले विचार शेअर करणार असल्याचे म्हटले आहे. राहुल यांनी दोन ट्विटसद्वारे याची माहिती दिली आहे. महत्त्वाचे म्हणजे चीनशी असलेल्या सीमा वादाच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर ट्वीट व व्हिडीओ पोस्टच्या माध्यमातून केंद्र सरकारला घेरले होते.

काय म्हणाले राहुल?
राहुल गांधी म्हणाले आहेत- सध्या भारतीय वृत्त माध्यमांचा एक मोठा भाग फॅसिस्ट हितसंबंधांसाठी काम करत आहे. द्वेषाने भरलेले नॅरेटिव्ह टीव्ही चॅनेल्स, व्हॉट्सऍप फॉरवर्ड व दिशाभूल करणार्‍या बातम्यांद्वारे पसरवले जात आहेत. आणि खोटेपणाने परिपूर्ण असणारा हा नॅरेटिव्ह भारताची अनेक भागात विभागणी करत आहे. ज्यांना सत्य जाणून घ्यायचे आहे त्यांच्या समोर आपले वर्तमान, इतिहास आणि वास्तव स्पष्ट व्हावे, अशी माझी इच्छा आहे. यामुळे उद्यापासून मी दररोज माझे विचार व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासह शेअर करेल.

गलवाननंतर सोशल मीडियावर सरकरला घेरले
विशेष म्हणजे गलवान खोऱ्यातील घटनेनंतरच राहुल गांधींनी केंद्र सरकारला घेरण्यास सुरवात केली होती. नंतर माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनीही या विषयावर एक पत्र लिहिले होते. यानंतर भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी मालिकेद्वारे मनमोहन सिंह यांना प्रत्युत्तर दिले होते. मात्र चीनशी असलेल्या सीमेवरील वादावर राहुल यांना केंद्र सरकारला घेरण्याबाबत सहयोगी पक्षांकडून कोणतेही सहकार्य मिळाले नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी याप्रकरणी कॉंग्रेसवरच निशाणा साधला.