‘या’ प्रकरणी राहुल गांधी आज पटना न्यायालयात लावणार हजेरी

पटना : वृत्तसंस्था – काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी यांच्याविरोधात उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांनी मानहानीचा दावा केला होता. या प्रकरणी राहुल गांधींना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत आज राहुल गांधी पटना न्यायालयात हजर राहणार आहेत.

लोकसभा निवडणुकांच्या प्रचारादरम्यान सर्व नेत्यांनी आरोप-प्रत्यारोप केले. याच प्रचारादरम्यान १३ एप्रिलला बेलूरच्या ककोर येथील झालेल्या सभेत राहुल गांधींनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. राहुल गांधींनी मोदी आडनावाच्या व्यक्तींवर भाष्य करणारे वक्तव्य केले होते. त्यानंतर बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार यांनी एप्रिलमध्ये मुख्य न्यायिक मॅजिस्ट्रेटमध्ये हे प्रकरण दाखल केले होते. त्यानंतर राहुल गांधी यांना न्यायालयाने हजर राहण्याचे आदेश दिले होते. आज राहुल गांधी याप्रकरणी पटना न्यायालयात  हजर राहणार आहेत. विशेष न्यायिक दंडाधिकारी गुंजन कुमार यांच्यासमोर याप्रकणाराची सुनावणी होणार आहे.

दरम्यान, राहुल गांधी यांनी यापूर्वीही कन्नड पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर वादग्रस्त विधान केले होते. त्यानंतर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हे प्रकरण शिवडी न्यायलयात सुरु होते. तेव्हा यावेळीही राहुल गांधी न्यायालयात हजर होते. या प्रकरणी शिवडी न्यायालयाने राहुल गांधी यांनी १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला होता.