राहुल गांधी महाराष्ट्रातून लढणार लोकसभा निवडणूक ?

मुंबई : वृत्तसंस्था- राहुल गांधींसाठी नांदेडचा मतदारसंघ राखीव ठेवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी महाराष्ट्रातून लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली जातांना दिसत आहे.

नांदेड हा काँग्रेससाठी सर्वात सुरक्षित मतदारसंघ मानला जातो. हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे राहुल गांधी हे नांदेडमधून निवडणूक लढवण्याचं हेदेखील सर्वात महत्त्वाचे कारण आहे. त्यामुळे राहुल गांधी नांदेड मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची शक्यता आहे. मुख्य म्हणजे रायबरेली आणि अमेठी हे मतदारसंघ नेहमीच काँग्रेसचे गड मानले गेले आहेत. यातच तिसरा पर्याय म्हणून महाराष्ट्रातील नांदेड मतदारसंघाचे नाव घेतले जात आहे. मुळे राहुल गांधी नांदेड मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची शक्यता आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार,  सोनिया गांधी यांच्या रायबरेली मतदारसंघातून राहुल गांधी निवडणूक लढवितील असे संकेत मिळत आहेत. याचे कारण म्हणजे आगामी लोकसभा निवडणूक सोनिया गांधी कदाचित लढवणार नाहीत, असे सांगितले जात आहे.

2014 ची लोकसभा निवडणूक राहुल गांधी यांनी अमेठी या त्यांच्या बालेकिल्ल्यातून लढविली होती. परंतु तेथे त्यांना स्मृती इराणी या भाजपाच्या उमेदवाराकडून चांगलीच टक्कर देण्यात आली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या मतदार संघातून पुन्हा स्मृती इराणी याच भाजपाच्या उमेदवार असतील असेही सांगितले जात आहे. म्हणूनच कदाचित राहुल गांधी यांच्यासाठी नांदेड आणि रायबरेली मतदार संघाचा पर्याय असल्याचे बोलले जात आहे.

याबाबत  नांदेडचे खासदार अशोक चव्हाण यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. राहुल गांधी देशाच्या कोणत्याही मतदार संघातून निवडणूक लढवू शकतात असे त्यांनी सांगितले आहे.

एखाद्या उमेदवाराला दोन मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास निवडणूक आयोगाची परवानगी आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत गुजरातसोबत उत्तर प्रदेशातील वाराणसी मतदारसंघातून नरेंद्र मोदींनी निवडणूक लढवली होती, त्याचा फायदा मोदींना झाला. त्यामुळे काँग्रेसकडून पंतप्रधानपदाचे प्रबळ दावेदार मानले जाणारे राहुल गांधीही अशाप्रकारे दोन मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात.