थकबाकीदार शेतकऱ्यांना जेलमध्ये जाऊ देणार नाही : राहुल गांधी

शेतीसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – शेतकर्‍यांचे कर्ज थकले, तर त्या शेतकर्‍यांना जेलमध्ये जाऊ देणार नाही. असा कायदा केला जाईल. शेतीसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प मांडला जाईल, अशी घोषणा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी संगमनेर येथील जाहीर सभेत बोलताना केली.

शुक्रवारी रात्री उशिरा गांधी यांची संगमनेर मध्ये काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभा झाली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, इतर लोकसभेपेक्षा ही निवडणूक वेगळी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जी आश्वासने दिली. ती त्यांनी पूर्ण केली का? अच्छे दिन आयेंगे, बेरोजगारोंको नोकरी देेंगे, शेतकर्‍यांची कर्जमाफी करणार, दोन कोटी तरुणांना नोकरी देणार, 15 लाख खात्यांवर देणार, अशी सर्व आश्‍वासने दिली. मात्र, ते एकही आश्‍वासन पूर्ण करू शकले नाहीत. गेल्या पाच वर्षात हे सरकार केवळ फसवे ठरले.

सध्या देशात बेरोजगारांची संख्या वाढत आहे. काँग्रेसने छत्तीसगड, मध्य प्रदेश व राजस्थानमध्ये कर्जमाफी करणार, अशी घोषणा केली आणि संपूर्ण कर्जमाफी करून दाखविली. दिलेल्या घोषणा पूर्ण करण्याची जबाबदारी काँग्रेस पक्षाची आहे, असेही गांधी म्हणाले.

यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, राष्ट्रीय सरचिटणीस मल्लिकार्जुन खर्गे, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे आदी उपस्थित होते.

राफेलमध्ये अंबानींचा तीस हजार कोटींचा फायदा

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राफेल प्रकरणात उद्योगपतींचा फायदा करून दिला. उद्योगपती अनिल अंबानी यांना 30 हजार कोटी रुपयांचा फायदा झाला आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.