राहुल गांधींची शुक्रवारी संगमनेर मध्ये जाहीर सभा

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची शुक्रवारी संगमनेर येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. शिर्डी मतदारसंघाचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांच्या प्रचारार्थ गांधी येणार आहेत.

शिर्डी मतदार संघासाठी 29 एप्रिल रोजी मतदान होत आहे. अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या या मतदारसंघातून काँग्रेसच्या वतीने आ. भाऊसाहेब कांबळे व शिवसेनेच्यावतीने खासदार सदाशिव लोखंडे हे निवडणूक रिंगणात आहेत. लोखंडे यांच्या प्रचारासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी जाहीर सभा घेतल्या आहेत. आता काँग्रेसच्यावतीनेही जोरदार शक्तिप्रदर्शनाची तयारी सुरू आहे. त्यामुळेच गांधी यांची सभा आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी होणाऱ्या जाहीर सभेचे काँग्रेस कार्यकर्ते व पोलिस प्रशासनाच्यावतीने तयारी सुरू आहे.