‘रेप इन इंडिया’ या राहुल गांधीच्या विधानाबाबत नितीन गडकरींनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ‘रेप इन इंडिया’ या केलेल्या शब्दप्रयोगावरून मोठे वादंग उठले आहे. लोकसभेतही भाजपने राहुल गांधींना या विधानावरून घेरलं असून राहुल गांधी यांनी माफी मागण्यास नकार दिला आहे. त्यानंतर आता रस्ते वाहतूक आणि दळणवळण मंत्री नितीन गडकरींनी राहुल गांधींवर जोरदार हल्ला चढवला आहे. बलात्कारासारख्या गंभीर विषयात राजकारण करण्याची गरज नाही. राहुल गांधी यांना कधी काय बोलायचे हे अजूनही समजत नाही. त्यांना बोलायची शिस्त नाही, असे नितीन गडकरी यांनी राहुल गांधीवर टीकास्त्र सोडलं आहे.

नितीन गडकरी यांनी एका न्युज चॅनलशी बोलताना राहुल गांधी यांच्यावर टीका केली. नितीन गडकरी पुढे म्हणाले, राहुल गांधींना बोलण्याची शिस्त नसून, त्यांना अजून बरंच काही शिकायचं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या विकासासाठी ‘मेक इन इंडिया’ सारखे कार्यक्रम राबवले आहेत. त्याची तुलना बलात्कारासारख्या आरोपाशी करून त्या कार्यक्रमाला कमकुवत करण्याचा प्रयत्न सुरु आहे. काँग्रेसच्या राज्यात आणि सध्याच्या काँग्रेस शासित राज्यात बलात्कार होत नाहीत का ? असा सवाल गडकरी यांनी उपस्थित केला आहे.

दुसरीकडे भाजपचे चंपारण्यमधील खासदार संजय जयस्वाल यांनी राहुल गांधी यांच्यवर टीका केली होती. 2000 वर्षापूर्वी विष्णुगुप्त चाणक्य यांनी म्हटलं होते की, परदेशी आईचा मुलगा हा कधीही राष्ट्रभक्त होऊ शकत नाही, असं म्हणत त्यांनी राहुल गांधीवर टीका केली होती. राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा स्मृती इराणी आणि इतर भाजप खासदारांनी जोरदार समाचार घेत माफी मागण्याची मागणी केली होती. मात्र, राहुल गांधी यांनी माफी मागण्यास नकार दिला.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/