राहुल गांधींच्या ‘त्या’ वक्तव्यावर सावरकरांचे नातू रणजित यांनी दिली ‘ही’ संतप्त प्रतिक्रिया

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मी राहुल सावरकर नाही, मी राहुल गांधी आहे. मी माफी मागणार नाही, असे म्हणणाऱ्या राहुल गांधी यांच्यावर टीकेची झोड उठत आहे. त्यातच सावरकरांचे नातू आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. चांगली गोष्ट आहे त्यांचे नाव राहुल सावरकर नाही, अन्यथा आम्हाला तोंड काळे करावे लागले असते, असे रणजित सावरकर म्हणाले.

रणजित सावरकर म्हणाले, ही चांगली गोष्ट आहे की, त्यांचे नाव राहुल सावरकर नाही. त्यांचे नाव सावरकर असते, तर आम्हाला तोंड काळे करावे लागले असते. राहुल गांधी यांनी आजी इंदिरा गांधी यांचे त्यांच्या नावातून नेहरू काढल्याबद्दल आभार मानले पाहिजेत. कारण त्यांचे आधीचे नाव इंदिरा गांधी-नेहरू होते. देश स्वतंत्र होण्याच्या एक वर्ष आधीच सत्तेच्या मोहाने नेहरुजींनी व्हाईसराय मंडळाचे सदस्य बनण्यासाठी ‘भारताचे सम्राट किंग जॉर्ज (सहावे) आणि त्यांचे उत्तराधिकारी आणि वंशज यांच्याशी एकनिष्ठ राहण्याची शपथ घेतली होती.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अंत्ययात्रेसाठी सरकारने तोफगाडा देण्यास नकार दिला होता, पण जेव्हा नेहरूजींचे प्रिय मित्र, लेडी माउन्टबॅटन यांचा मृत्यू झाला. तेव्हा कोणीही न मागताच भारतीय नौदलाची युद्धनौका ‘त्रिशूल’ तिथे पाठवली होती. हा देश काय कोणाची जहागीर आहे ? आता ही स्वातंत्र्यपूर्व काळातील देशभक्त काँग्रेस राहिली नाही, हा तर एका गुलाम वंशाचा पक्ष झाला असल्याचे रणजित सावरकर म्हणाले.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/