आई करते धुण्याभांड्याची कामं, मुलाला मिळाली ISRO मध्ये नोकरी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मुंबईतील राहुल घोडके नावाच्या तरूणाने झोपडपट्टी ते देशातील नामांकित अवकाश संस्था ‘इस्रो’ पर्यंत लांबचा पल्ला गाठला आहे. राहुल घोडके याने आर्थिक संकटांचा सामना करत इस्त्रो येथे तंत्रज्ञ म्हणून नोकरी मिळविली आहे. या कामगिरीमुळे त्याच्या आईचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

चेंबूर परिसरातील मारौली चर्चमध्ये असलेल्या नालंदा नगरातील झोपडपट्टीत 10X10 च्या घरात राहणारा राहुल घोडके याने कठीण परिस्थितीतही यश मिळवले आहे . दहावीच्या परीक्षेत राहुल प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाला. या वेळी त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला. सर्व अडचणी असूनही त्याने धैर्य गमावले नाही आणि अभ्यास सुरू ठेवला.

वडिलांच्या निधनामुळे राहुल आतून खचला. कुटुंबाची सर्व जबाबदारी राहुलच्या खांद्यावर पडली. राहुल लग्नाच्या ठिकाणी केटरर्स म्हणून काम करून, तर त्याची आईसुद्धा इतरांच्या घरी जाऊन घरातील भांडी धुवून घरखर्च चालवत असे. दरम्यान, राहुलने आपला अभ्यास सुरूच ठेवला होता.

परंतु, अभ्यासाकडे पूर्ण लक्ष देण्यास वेळ नसल्यामुळे राहुल बारावीच्या परीक्षेत नापास झाला. चेंबूर जवळील गोवंडी येथे त्याने आयटीआयचा (इलेक्ट्रॉनिक) कोर्स केला. अभ्यासामध्ये हुशार असलेल्या राहुलने आयटीआयमध्ये अव्वल स्थान प्राप्त केले आणि प्रथम श्रेणीतून आपला अभ्यासक्रम पूर्ण केला. नंतर त्याला एल अँड टी कंपनीत नोकरी मिळाली, त्याबरोबर त्याने इंजिनीअरिंगच्या डिप्लोमासाठी प्रवेश घेतला.

कंपनीत काम करता करता राहुलने अभ्यास सुरु ठेवला. इस्रोमध्ये डिप्लोमा अभियंता पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत राहुल देशभरातील आरक्षित उमेदवारांच्या श्रेणीत तिसऱ्या क्रमांकावर आणि खुल्या वर्गातून 17 व्या क्रमांकावर होता आणि आता राहुल गेल्या 2 महिन्यांपासून इस्रोमध्ये तंत्रज्ञ म्हणून कार्यरत आहे. इस्रोमध्ये राहुलला नोकरी लागल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. त्यांचे अभिनंदन करण्यासाठी राहुलच्या घरी गर्दी उसळली होती.

Visit : Policenama.com