‘मी भोगलेल्या यातना कोणाच्याही वाट्याला येऊ नयेत’

मुंबई  : वृत्तसंस्था – मी भोगलेल्या यातना कोणाच्याही वाट्याला येऊ नयेत अशी भावना BCCI चे सीईओ राहुल जोहरी यांनी व्यक्त केली आहे. काही दिवसांपूर्वी जोहरी यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप करण्यात आले होते. परंतु त्यात त्यांना निर्दोष ठरवण्यात आल्यानंतर त्यांनी आज पदभार स्वीकारला आहे आणि आपली भावना व्यक्त करताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

राहुल जोहरी आणि पीडित महिलेचे इमेलवरील संभाषण ट्विटरवरुन  जाहीर करण्यात आले होते आणि यानंतर BCCI मध्ये मोठी खळबळ माजली होती. इतकेच नाही तर राहुल जोहरी BCCI मध्ये कार्यरत नसताना हे प्रकरण घडल्याचा महिलेने दावा केला होता. परंतु सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या क्रिकेट प्रशासकीय समितीने राहुल जोहरी यांची चौकशी करुन या प्रकरणी त्यांना दोषमुक्त ठरवले. याचसोबत राहुल जोहरी यांना BCCI चे CEO म्हणून काम करण्याचाही परवानगी देण्यात आली होती.

बाजारात 50 रुपयांच्या बनावट नोटांचा सुळसुळाट, अशी ओळखा खरी नोट

‘माझ्यावर आरोप झाल्यानंतर मी आणि माझे कुटुंब प्रचंड मानसिक यातना भोगत होतो. गेला दीड महिना आम्ही ज्या यातना सोसल्या आहेत, तशा प्रकारच्या यातना कोणाच्याही वाट्याला येऊ नयेत’, असे ते म्हणाले.

हे प्रकरण समोर आल्यानंतर प्रशासकीय समितीने राहुल जोहरी यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं होतं. जोहरी यांना क्लिनचीट देण्याचा निर्णय हा प्रशासकीय समितीने एकमताने घेतला नव्हता. विनोद राय आणि डायना एडुलजी यांच्यामध्ये या प्रकरणावरुन मतभिन्नता होती, असं समोर आलं आहे. प्रशासकीय समिती प्रमुख विनोद राय यांनी जोहरी यांना कामावर रुजु होण्यास काहीच हरकत नसल्याचं मत बैठकीत व्यक्त केलं होतं, मात्र समितीच्या दुसऱ्या सदस्या डायना एडुलजी यांनी जोहरी यांनी राजीनामा द्यावा, असं मत मांडलं होतं.