पंतप्रधानपदाबाबत राहुल यांनी केले ‘हे’ भाष्य

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशाचा पंतप्रधान कोण असणार, असा प्रश्न राहुल गांधी यांना वारंवार विचारला जातो. त्यापद्धतीचे आव्हान भाजपकडूनही वेळोवेळी करण्यात आले आहे. आता मात्र, यावर राहुल गांधी यांनी सूचक भाष्य केले. देशाचा पुढील पंतप्रधान हा जनता ठरवेल, असे राहुल गांधी म्हणाले आहेत. मात्र, पंतप्रधानपदाची जबाबदारी आली तर ती पार पाडू, असे संकेतही त्यांनी यावेळी दिले.

सध्यातरी महाआघाडीच्या घटक पक्षांकडून पंतप्रधान पदाचा उमेदवार ठरविण्यात आलेला नाही. मात्र काँग्रसेकडून पंतप्रधान म्हणून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांचेच नाव पुढे करण्यात येत आहे. राहुल गांधी हे भविष्यातील पंतप्रधान असतील, अशीही सध्या चर्चा सुरु झाली आहे. त्यावर राहुल यांनी सावध पवित्रा घेत आपण पंतप्रधान पदासाठी तयार असल्याचे संकेतही दिले आहेत.

या लोकसभा निवडणूकीसाठी भाजपकडून पंतप्रधानपदाचे प्रमुख दावेदार म्हणून नरेंद्र मोदींचे नाव पुन्हा एकदा पुढे केले आहे. मात्र, भविष्यात संधी मिळाली तर पंतप्रधान होण्यासाठी तयार असल्याचे संकेत राहुल गांधी यांनी दिले आहे. दक्षिण भारतातल्या जनतेसोबत काँग्रेस असल्याचा संदेश देण्यासाठीच वायनाडमधून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे राहुल यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.