लोणावळा शिवसेनेच्या माजी शहर प्रमुखाच्या खून प्रकरणी 2 जणांना कोठडी, इतर संशयित ताब्यात

लोणावळा : पोलीसनामा ऑनलाइन – लोणावळ्यातील बहुचर्चित माजी शहरप्रमुख राहुल उमेशभाई शेट्टी हत्या प्रकरणातील दोन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. सुरज अगरवाल ( वय ४२, रा. वर्धमान सोसायटी लोणावळा), दीपाली भिल्लारे (वय ३९, रा. भांगरवाडी लोणावळा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांना न्यायालयाने ३१ ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहेत.

शेट्टी हत्या प्रकरणातील अटक करण्यात आलेल्यांची संख्या दोन झाली असून अन्य आरोपींचा शोध सुरु आहे. शिवसेनेचे माजी शहरप्रमुख राहुल शेट्टी यांची सोमवारी (दि.२६) सकाळी त्यांच्या निवास्थानाबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. शेट्टी यांच्या पत्नी सौम्या शेट्टी यांनी फिर्याद दिली होती.

त्यानुसार मोबिन इनामदार (वय३५, रा. भैरवनाथ नगर कुसगाव लोणावळा), कादर इनामदार (वय ३३, रा. भांगरवाडी लोणावळा), सुरज अगरवाल (वय ४२, रा. वर्धमान सोसायटी लोणावळा), दिपाली भिल्लारे (वय३९, रा. भांगरवाडी लोणावळा), सादीक बंगाली (वय४४, रा. गावठाण लोणावळा) व एक अज्ञात आरोप पत्ता माहिती नाही यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल शेट्टी आपल्या घराजवळील येवले चहा दुकानाशेजारी कट्टयावर बसलेले असताना पूर्ववैमनस्यातून राहुल यांच्या विरोधकांनी कट रचून त्यांच्या खून केला. त्यांच्या डोक्यात व तोंडावर बंदुकीच्या गोळ्या झाडून तसेच धारदार शस्त्राने वार करुन हत्या केली होती. घटनेची माहिती मिळताच पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विवेक पाटील, सहायक पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, एलसीबीचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, लोणावळा शहर पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर आरोपींच्या शोधार्थ सहा पथके रवाना झाली असून, अटक आरोपींकडून कसून चौकशी सुरु आहे.

You might also like