पाथर्डी तालुक्यातील गांजाच्या शेतीवर पोलिसांचा छापा

पोलीसनामा ऑनलाईन टीम  – पाथर्डी: तालुक्यातील एकनाथवाडी शिवारातील डोंगरेवस्ती येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने टाकलेल्या धाडीत ६२ किलो वजनाचा गांजा जप्त करण्यात आला आहे. या गांजाची किंमत ६ लाख २३ हजार रुपये असून या प्रकरणी दोन जणांना अटक केली आहे. दरम्यान या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली असून रात्री उशिरा याबाबत जप्त मुद्देमाल याची मोजदाद करून फिर्याद दाखल करण्यात आली.

एकनाथवाडी शिवारामध्ये काहीजण शेतामध्ये गांजाचे झाडे लावून राज्यात मोठ्या प्रमाणावर गांजा पुरवत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. शेवगाव पोलीस उपविभागीय अधिकारी सुदर्शन मुंडे यांनी या पथकाचे नेतृत्त्व करत बुधवारी सायंकाळी चार वाजण्याच्या दरम्यान गावातील विष्णू अनिल डोंगरे,बाळासाहेब भानुदास खेडकर तसेच शहादेव रावसाहेब खेडकर यांच्या राहत्या घरी तसेच शेतावर धाड टाकून ६ लाख २३ हजार रु.किमतीचे ६२ किलो ३४५ ग़्रॉम वजनाचे सुका गांजा व शेतात उभी असलेली गांज्याची झाडे जप्त केली.

काही जणांनी शेतात चक्क गांजाची झाडे लावली होती. परंतु हे केवळ एकट्याचे काम नाही यामध्ये आणखी काही जण असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. एकनाथ वाडीगावांमध्ये आणखी किती जण गांज्याची तस्करी करीत होते तसेच गांजा तस्करी मधला मुख्य सूत्रधार कोण याबाबत पोलीस तपास करत आहेत. घटनेची माहिती मिळताच स्थानिक गावपुढाऱ्यांनी पोलीस ठाण्यात गर्दी केली होती.