पिंपरी न्यायालयाच्या शेजारील मटका अड्ड्यावर छापा, 18 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी मोरवाडी कोर्टाच्या शेजारी लाल टोपीनगर सर्कस मैदानावर सुरु असलेल्या मटका अड्ड्यावर छापा मारुन ८५ हजार ३९० रुपयांचा ऐवज जप्त केला आणि 17 ते 18 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई सामाजिक सुरक्षा पथकाने केली आहे.

योगेश बालाजी तिडके पोलीस शिपाई नेमणुक सामाजिक सुरक्षा पथक पिपंरी चिंचवड पोलीस आयुक्तालय यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

त्यानुसार विनय कुमार ऊर्फ पाल्या राम सहजीवन कुर्मी (३६ वर्षे रा , लालटोपीनगर पिपंरी पुणे) व कल्याण मटका चालक मालक अशा एकूण १८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी 3 ते 5 वाजताच्या दरम्यान पिंपरी कोर्टाच्या शेजारी लाल टोपीनगर सर्कस मैदानावर लिंबाच्या झाडाखाली मोकळ्या जागेत अवैधरित्या जुगार खेळताना आरोपी यांनी शासनाच्या नियमांचे उल्लघन करून मानवी सुरक्षीतता धोक्यात येईल असे कृत्य करुन कोरोना या साथीच्या रोगाची संसर्ग पसरवण्याचे कृत्य केले आणि अवैधरित्या स्वत : चे अर्थिक फायद्यासाठी पैशावर रोख रक्कम मोबाईल , पेन , कल्याण मटका साहित्य जुगार खेळतांना व खेळविताना मिळुन आले. त्यानुसार आरोपींकडून ८५,३९० रुपये आणि जुगाराचे साहित्य पोलिसांनी हस्तगत केली आहे. अधिक तपास पिंपरी पोलीस करत आहेत.