नागपुरात एम्प्रेस मॉलमधील हायप्रोफाईल सेक्‍स रॅकेटचा पर्दाफाश

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – नागपूर मधील एम्प्रेस मॉलमध्ये असलेल्या ‘मसाज ॲण्ड स्पा’ सेंटरमध्ये सुरू असलेल्या हायप्रोफाईल सेक्‍स रॅकेटवर गुन्हेशाखेने छापा टाकत पर्दाफाश केला आहे. या कारवाईत तीन तरुणींसह एक विदेशी युवती ताब्यात घेण्यात आली आहे. या प्रकरणी एका दलाल युवतीसह चौघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

एम्प्रेस मॉलच्या पहिल्या मजल्यावर दुकान क्र. १२१ मध्ये ‘फिनिक्‍स वेलनेस सेंटर’ नावाने मसाज ॲण्ड स्पा सेंटर आहे. यामध्ये महिला आणि पुरुषांची मसाज थेरपी केली जाते. मनीष लांजेवार आणि ढेरेक मंचेडो हे या दुकानाचे मालक आहेत. गेल्या दीड वर्षांपासून मनीष आणि ढेरेक यांनी सेक्‍स रॅकेट सुरू केले. मसाजच्या नावाखाली ५ प्रशस्त रूममध्ये आंबटशौकीन पुरुषांना युवतीशी शारीरिक संबंधाची व्यवस्था करण्यात आली होती. येथे दलाल फैजान शेख हा तरुणी पुरवत होता. गेल्या काही महिन्यांपासून विदेशी तरुणींची मागणी वाढल्यामुळे फैजान आणि मनीष लांजेवार दिल्लीला गेले. तेथून नेपाळ आणि भिलाई येथील तरुणींना देहव्यापारासाठी नागपुरात आणले. दलाल तन्वी महेंद्र चोटलिया (वय २१, निकुंजमोहन क्‍लासिक अपार्टमेंट, गिट्टीखदान) हिच्याकडे दोन्ही तरुणींसाठी आलेल्या ग्राहकांना पैशाचा सौदा करण्याची जबाबदारी देण्यात आली. चौघांनी गेल्या दीड वर्षांपासून मोठे सेक्‍स रॅकेट उघडून लाखोंची उलाढाल केली होती.

दरम्यान, गणेशपेठ पोलिस ठाण्याचे गुन्हे शाखेचे उपायुक्‍त नीलेश भरणे यांना या संदर्भातील माहिती मिळाली. त्यावेळी त्यांनी एसएसबीचे उमेश बेसरकर, अनुपमा जगताप यांच्या पथकाने शुक्रवारी सापळा रचला. पाठवलेल्या युवकाने मनीष आणि ढेरेक यांची भेट घेत सौदा केला. तन्वी चोटलियाने दोन्ही मुलींना दाखवून युवकाला रूम उपलब्ध करून नेपाळी युवतीला रूममध्ये पाठविले. त्यावेळी युवकाने इशारा करताच पोलिसांनी छापा घातला. तन्वीसह तिन्ही युवतींना ताब्यात घेतले.