रायगडच्या महाड दुर्घटनेबाबत धक्कादायक माहिती उजेडात, ‘या’ कारणामुळं बिल्डींग कोसळल्याचा संशय

पोलीसनामा ऑनलाइन – महाड येथील काजळपूरा परिसरातील तारीक गार्डन ही पाच मजली इमारत सोमवारी सायंकाळच्या सुमारास कोसळली. या दुर्घटनेत ९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अजून १७ जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, इमारत पूर नियंत्रण रेषेत तळ्याच्या शेजारीच बांधण्यात आली असल्याची, धक्कादाक माहिती समोर आली आहे. या इमारतीजवळ पावसाळ्यात कमरेइतके पाणी साचत असल्याचं स्थानिक नागरिकांनी सांगितलं आहे.

महाड दुर्घटनेची गंभीर दखल घेत याप्रकरणी बिल्डरसह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इमारतीचे बांधकाम निष्कृष्ट दर्जाचे असल्याने इमारत पूर्णपणे ढासळली असून, संबंधितांवर कठोर कारवाईचे आदेश सरकारकडून देण्यात आले आहे. तसेच तत्कालीन मुख्याधिकारी, आर्किटेक्चर, नगरपालिका इंजिनिअर आणि आरसीसी कन्सल्टन्स अशा पाच जणांवर कारवाईचा बडगा उचलला आहे. बिल्डरला अटक करण्यासाठी महाड येथून पथक रवाना झालं असल्याची माहिती मिळाली आहे.

बचावकार्य युद्धपातळीवर सुरु असून ढिगाऱ्याखालून एका चार वर्षाच्या चिमुकल्याला सुखरुप बाहेर काढण्यात आलं आहे. दरम्यान, आतापर्यंत नऊ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती, ए एन आय या वृत्तसंस्थेने दिली आहे. मृतांच्या कुटूंबीयांना चार लाखांची नुकसानभरपाई देण्यात येणार असल्याची माहिती, राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

पत्त्यांची इमारत कोसळावी, तशी ही पाच माळ्यांची इमारत कोसळली. तेव्हा धुराचा मोठा लोट पसरला. परिसरात नागरिकांची गर्दी जमली, इमारत अशी अचानक पडल्याने नागरिकांनी आरडा ओरडा सुरु केला. तर काहींनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने मदत मिळावी म्हणून नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला.

दरम्यान, पुण्यातील तळेगाव दाभाडे येथून महाडकडे येणाऱ्या एनडीआरएफच्या टीमसाठी ग्रीन कॉरिडोर करण्यात आला होता. त्यासाठी कोणत्याही प्रकारचा वाहतुकीचा अडथळा निर्माण होऊ नये म्हणून पोलीस आणि रायगड पोलिसांनी विशेष सतर्कता बाळगली होती. रात्री एक वाजून दहा मिनिटांनी NDRF चे पथक महाड येथील दुर्घटना स्थळी पोहचून त्यांनी तात्काळ बचावकार्याला सुरुवात केली.