‘निसर्ग’चा प्रकोप ! रायगडमधील 1 लाखापेक्षा जास्त घरांचं नुकसान

पोलिसनाामा ऑनलाईन – निसर्ग वादळाच्या प्रकोपामुळे रायगडकर हैराण झाले असून जिल्ह्यात आपत्तीमुळे दगावलेल्याची संख्या चारवर पोहोचली आहे. 39 जनावरांचाही मृत्यू झाला आहे. त्याशिवाय तब्बल एक लाखांवर अधिक घरांचे नुकसान झाले आहे. ठिकठिकाणी वीजपुरवठा खंडीत झाल्याने, बहुतांश रायगड जिल्हा अंधारात आहे, दूरसंचार यंत्रणा ठप्प आहेत. वादळाच्या या तडाख्यातून सावरण्यासाठी जिल्ह्याला बराच कालावधी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

निसर्ग वादळाचा सर्वाधिक तडाखा, अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन, माणगाव, रोहा तालुक्यांना बसला आहे. वादळामुळे जिल्ह्यातील 799 शाळा आणि अंगणवाड्यांचे नुकसान झाले. तर 1 लाख 10 हजार घरांची पडझड झाली. त्याशिवाय 374 कार्यालये, 7 गोदामे तर 2 रुग्णालयांची पडझड झाली. जिल्ह्यातील 6 हजार 766 हेक्टर क्षेत्रावरील शेती आणि फळबागांचे वादळामुळे नुकसान झाले आहे. महावितरणचे 3 हजार 500 उच्च दाब क्षमतेचे खांब, 5 हजार 100 लघु दाब क्षमतेचे खांब आणि 250 रोहित्रांची वादळात मोडतोड झाली आहे. विद्यूत पुरवठा सुरळीत होण्यासाठी सात ते आठ दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील 10 मच्छीमार बोटी आणि 12 हजार हेक्टर मत्स्य शेतीचे नुकसान झाले आहे. दुरसंचार यंत्रणाही ठप्प झाली आहे. आयडीया कंपनीचे 126 टॉवर बंद पडले आहेत. जीओ कंपनीचे 143 मोबाईल टॉवर बंद पडले आहेत. दक्षिण रायगड मधील बीएसएनएलची यंत्रणाही कोलमडली आहे.