13 जुलैपासून सुरू होणार्‍या लॉकडाउनमध्ये पुण्यात रेल्वे, विमान वाहतूक सुरू राहणार का ? जाणून घ्या

पुणे :  पोलीसनामा ऑनलाईन –  कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव लक्षात घेता पुणे शहरात दोन दिवसांनंतर 14 ते 23 जुलै दरम्यान कडक लॉकडाऊन करण्यात येणार आहे. या काळात अत्यावश्यक सेवा वगळता सर्वकाही बंद राहणार आहे, मात्र शहरातून होणारी विमान आणि रेल्वे वाहतूक सेवा सुरूच राहणार आहे. तसेच लोहगाव विमानतळ आणि पुणे रेल्वे स्थानकावरून प्रवाशांना रिक्षा सेवाही उपलब्ध राहणार आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी लॉकडाऊ उघडल्यानंतर अनेक बाबतीत नियम शिथिल करण्यात आले होते. त्याअंतर्गत देशात 26 मे पासून ठराविक ठिकाणांसाठी विमान वाहतूक सुरू झाली. पुण्यातून दिल्ली, कोलकत्ता, चेन्नई, बंगळुरू, हैदराबाद, अहमदाबाद, प्रयागराज या 8 शहरांसाठी विमान वाहतूक सुरू झाली. या लॉकडाऊन संदर्भांत विमानतळ प्रशासनाने स्पष्ट केले कि, पुण्यातील लॉकडाउन हा लोकल स्वरूपाचा निर्णय आहे. त्यामुळे विमान वाहतुकीवर त्याचा परिणाम होणार नाही. त्याचप्रमाणे 1 जूनपासून देशात 200 मार्गांवर रेल्वे वाहतूक सुरू झाली आहे. त्यात पुण्यातून ये- जा करणाऱया गाड्यांचाही समावेश आहे. पुण्यातील लॉकडाऊनचा या रेल्वे वाहतुकीवर परिणाम होणार नाही, असे मध्य रेल्वेच्या पुणे विभागाचे जनसंपर्क मनोज झंवर यांनी सांगितले.

माहिती वाहतूक शाखेतील सहायक आयुक्त सुरेंद्रनाथ देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानतळावर जाण्यासाठी शहरातून 9859198591 या क्रमांकावर रिक्षा उपलब्ध होणार असून कॅब आणि प्री-पेड रिक्षालाही परवानगी देण्यात आली आहे. यासाठी प्रवाशांनी विमानाचे तिकिट किंवा बोर्डिंग पास जवळ ठेवावेत , असेही त्यांनी यावेळी सांगितले. रेल्वे स्थानकावरूनही उपलब्ध करून दिलेल्या मोबाईल क्रमांकावरून प्रवाशांना रिक्षा मिळणार आहे. रेल्वे प्रवासांनीही प्रवासाचे तिकिट किंवा मेसेज जवळ बाळगावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. महत्वाचे म्हणजे विमान प्रवासासाठी किमान तीन तास आधी तर रेल्वे प्रवासासाठी प्रवाशांना किमान तासभर आधी स्थानकावर उपस्थित राहणे आवश्यक आहे. त्यासाठी विमानतळ आणि रेल्वे स्थानकावर पुरेशी तयारी करण्यात आली असल्याचे विमानतळ आणि रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले.