‘रेल्वे’मध्ये नोकरी करणार्‍यांसाठी मोठी बातमी ! आता घरबसल्या मिळतील ‘या’ सर्व सुविधा, जाणून घ्या

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षांनी रेल्वे कर्मचार्‍यांसाठी ऑनलाइन ई-पास व तिकिट बुकिंगसाठी सीआरआयएसद्वारे मानव संसाधन व्यवस्थापन प्रणाली (एचआरएमएस) प्रकल्प अंतर्गत विकसित केलेल्या ई-पास मॉड्यूलचा आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून शुभारंभ केला. यावेळी रेल्वे बोर्डाचे सर्व सदस्य, आयआरसीटीसीचे अध्यक्ष सह-व्यवस्थापकीय संचालक, सीआरआयएसचे मॅनेजिंग डायरेक्टर, सर्व जनरल मॅनेजर, पीसीपीओएस, पीसीसीएमएस, पीएफए आणि डीआरएम उपस्थित होते.

यावेळी मानव संसाधन महासंचालकांनी ई-पास मॉड्यूलच्या विविध बाबी व त्यातील टप्प्याटप्प्याने राबविलेल्या धोरणाविषयी माहिती दिली. कर्मचार्‍यांना पास देण्याची प्रक्रिया आतापर्यंत मॅन्युअल राहिली आहे. याशिवाय रेल्वे कर्मचाऱ्यास पासवर ऑनलाईन तिकिटांची बुकिंग करण्याची सुविधा देखील नव्हती.

कर्मचारी कुठूनही ऑनलाईन अर्ज करू शकतील

ईआर-पास मॉड्यूलला एचआरएमएस प्रकल्पांतर्गत सीआरआयएसद्वारा विकसित केले गेले आहे. ते टप्प्याटप्प्याने भारतीय रेल्वेला जोडले जाईल. या सुविधेमुळे रेल्वे कर्मचार्‍यास पाससाठी अर्ज करण्यासाठी ऑफिसमध्ये येण्याची गरज भासणार नाही किंवा पास जारी होण्याची वाट पहावी लागणार नाही. कर्मचारी कुठूनही ऑनलाईन अर्ज करू शकतील आणि ई-पास ऑनलाइन मिळवू शकतील. ई-पाससाठी अर्ज आणि तो मिळविण्यासाठी संपूर्ण प्रक्रिया मोबाइलवर उपलब्ध असेल. याशिवाय पूर्वीप्रमाणे पीआरएस/ यूटीएस काउंटरकडून तिकिट बुकिंग सुविधेव्यतिरिक्त पासवर तिकिट बुकिंग करण्याची सुविधाही आयआरसीटीसीच्या वेबसाइटवर उपलब्ध असेल.

या सुविधेमुळे रेल्वे कर्मचाऱ्यांना सहजपणे रेल्वे पास वापरण्यास मदत होईल आणि त्याचबरोबर सर्व अधिकाऱ्यांना पास देण्याचे काम सुलभ होईल. एचआरएमएस प्रकल्प भारतीय रेल्वेच्या संपूर्ण मानव संसाधन प्रक्रियेचे डिजिटलायझेशन करण्यासाठीची एक व्यापक योजना आहे.

एचआरएमएसमध्ये एकूण 21 मॉड्यूलची योजना बनविली गेली आहे. मागील वर्षी सुरू झालेल्या एचआरएमएसच्या कर्मचारी मास्टर आणि ई-सर्व्हिस रेकॉर्ड मॉड्यूलमध्ये सुमारे 97 टक्के रेल्वे कर्मचार्‍यांची मूलभूत डेटा एंट्री पूर्ण झाली आहे. सीआरआयएस लवकरच एचआरएमएसचे ऑफिस ऑर्डर मॉड्यूल आणि सेटलमेंट मॉड्यूल लवकरच लाँच करणार आहे.