आता रेल्वे प्रवास अधिक सुरक्षित, रेल्वेतही ‘ब्लॅक बॉक्स’

लखनऊ: वृत्तसंस्था
विमानांमध्ये प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी ‘ब्लॅक बॉक्स लावलेले असतात त्याचप्रमाणे आता रेल्वेमध्ये देखील ‘ब्लॅक बॉक्स’ बसवले जाणार आहे. रेल्वे अपघातांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन हा महत्वाचा निर्णय नक्कीच स्वागतार्ह आहे. ब्लॅक बॉक्स असलेल्या रेल्वेच्या डब्ब्यांचे अनावरण रायबरेलीतील रेल कोच फॅक्टरीमध्ये झाले. रेल्वे गाड्यांमधील ‘ब्लॅक बॉक्स’ अपघाताचे नेमके कारण समजून घेण्यासाठी महत्वाचे ठरते. ही कारणे स्पष्ट झाल्यास त्यावर उपाय योजना करणे सोपे जाते.

राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त ब्लॅक बॉक्स असलेल्या स्मार्ट कोचेसचं अनावरण करण्यात आले. तसेच रेल्वेतल्या या ब्लॅक बॉक्स चे आणखी एक वेगळे वैशिष्ट्य म्हणजे , ब्लॅक बॉक्सच्या माध्यमातून अंतर्गत वायर्सचं तापमान मोजलं जाईल. याशिवाय केबलची स्थितीदेखील तपासली जाईल. त्यामुळे शॉर्ट सर्किट आणि त्यामुळे होणारं नुकसान टाळता येऊ शकेल.

रेल्वेतील ब्लॅक बॉक्स विमानातील ‘ब्लॅक बॉक्स’च्या तुलनेत अधिक कार्यक्षम आणि अत्याधुनिक असतील, असे मुख्य अभियंते इंद्रजित सिंग यांनी सांगितले. ”विमानातील ब्लॅक बॉक्स अपघात रोखू शकत नाहीत. मात्र स्मार्ट कोचेसमधील ब्लॅक बॉक्स अपघात रोखू शकतात. अनेकदा एक्स्प्रेस गाड्या रुळांवरुन घसरतात. असे अपघात रोखण्यात ‘ब्लॅक बॉक्स’ महत्त्वाची भूमिका बजावेल. ब्लॅक बॉक्सद्वारे विविध निकष लक्षात घेऊन सुरक्षेचे मूल्यमापन केले जाईल. यावेळी काही दोष आढळल्यास त्याची माहिती आपोआप संदेश देखरेख करणाऱ्या यंत्रणेला देण्यात येईल. त्यानंतर आवश्यक ती दुरुस्ती केली जाईल,” अशी माहिती सिंग यांनी दिली.

‘ब्लॅक बॉक्स’ असलेले स्मार्ट कोचेस रेल्वे वाहतूक क्षेत्रात महत्वपूर्ण भूमिका बजावतील यामुळे रेल्वे प्रवास अधिक सुरक्षित होणार आहे’. असे रायबरेली कोच फॅक्टरीचे व्यवस्थापक राजेश अगरवाल यांनी सांगितले.