रेल्वे बोर्डाने ‘वंदे भारत’ ट्रेनसाठी सुधारीत टेंडर काढले, रेल्वेच्या कोच फॅक्टरीत तयार होतील 44 ट्रेन

नवी दिल्ली : वंदे भारत ट्रेनसाठी रेल्वेने पुन्हा एकदा टेंडर जारी केले आहे. 44 वंदे भारत ट्रेन सेटसाठी सुधारीत टेंडर आत्मनिर्भर भारत योजनेंतर्गत जारी केले आहे. तसेच वेबसाइटवर टेंडर अपलोड करण्यात आले आहे. रेल्वेचा दावा आहे की, या ट्रेन सेटच्या निर्मितीमुळे आत्मनिर्भर भारतला प्रोत्साहन मिळेल.

सेमी हायस्पीड वंदे भारतचे यश पाहता रेल्वेने 44 ट्रेन सेट चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी 29 सप्टेंबरला प्री बिड मीटिंग बोलावण्यात आली आहे. 17 नोव्हेंबरला टेंडर उघडण्यात येतील. ट्रेन सेट चेन्नईयेथील आयसीएफ, कपूरथलायेथील एमसीएफ आणि रायबरेली कोच फॅक्टरीत बनवले जातील. यावेळी टेंडर स्वदेशी जारी केले जातील.

मागच्यावेळी जे टेंडर जारी करण्यात आले होते त्यामध्ये चीनच्या एका कंपनीने ट्रेन सेट बनवण्याची इच्छा जाहीर केली होती. या कारणामुळे मागच्यावेळी हे संपूर्ण टेंडर रद्द करण्यात आले होते. सुधारीत टेंडर मेक इन इंडिया धोरणांतर्गत आहेत. ट्रेनमध्ये वापरण्यात येणारे 75 टक्के सामान स्वदेशी असेल तर 25 टक्के परदेशातील असेल.

वंदे भारत ट्रेन चेन्नई येथील कोच फॅक्टरीत अवघ्या एका वर्षात मेक इन इंडियाअंतर्गत 100 कोटी रूपयांच्या खर्चात तयार करण्याचे यश मिळवले होते. हा देशातील पहिला सेमी हायस्पीड ट्रेन सेट आहे. इंजिनशिवाय चालणारी डेमू व मेमूचे हे अपग्रेड वर्जन आहे. ही ट्रेन दिल्ली-वैष्णव देवी व दिल्ली-वाराणसीदरम्यान यशस्वीपणे धावत आहे.